जवानांच्या बलिदानाची आठवण जीवंत ठेवण्यासाठी शहीद स्मारक एक पवित्र स्थान ठरेल : मेजर जनरल विक्रम वर्मा

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदे 

दि.१३ जून २०२५

प्रतिनिधी,

अहिल्यानगर :- देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाची आठवण व प्रेरणा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले हे शहीद स्मारक (Martyred Soldier) एक पवित्र स्थान ठरेल, असे प्रतिपादन मेजर जनरल विक्रम वर्मा (Maj Gen Vikram Varma) यांनी केले. अहिल्यानगर शहरातील सैनिक लॉन येथे आयोजित शहीद स्मारक (Martyr’s Memorial) अनावरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

       यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, ब्रिगेडियर सुनील कुमार, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे, रोटरी क्लबचे डॉ.प्रसन्न देवचक्के आदी उपस्थित होते.

      मेजर जनरल विक्रम वर्मा म्हणाले, (Maj Gen Vikram Varma)

देश रक्षणार्थ जवान आपले सर्वस्व पणाला लावून सीमेवर लढत असतात. त्यांच्या या बलिदानाचे स्मरण निश्चितच सर्व देशवासियांना असले पाहिजे. देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून नागरिकांनी, सेवानिवृत्त सैनिकांनी तरुणांना सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवेसाठी प्रवृत्त केले पाहिजे. नौदल, एनडीएमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. सैन्याच्या सक्षमीकरणामध्ये महिलांचे मोठे योगदान राहणार असून अहिल्यानगर येथील सैनिकी मुलींच्या वसतीगृहातून अधिकाधिक विद्यार्थीनी अधिकारी म्हणून सैन्यामध्ये भरती व्हाव्यात. निवृत्त सैनिकांना त्यांच्या सेवा काळामध्ये आलेल्या अनुभवाचा लाभ विविध उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना करुन द्यावा. सैन्य सेवेतून जरी निवृत्त झाले असलात तरी देशसेवेतून निवृत्त होऊ नका, असे आवाहनही श्री. वर्मा यांनी यावेळी केली.

     समाजाला पुढे नेण्यासाठी इतिहासाचे स्मरण निश्चिचत आवश्यक आहे. देश रक्षणार्थ बलिदान दिलेल्या तसेच देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढत असलेल्या जवानांच्या कुटुंबाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे. जवानांच्या कुटुंबीयांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून संवेदनशीलपणे सोडवल्या गेल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही श्री. वर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

      जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, जिल्ह्यात देशसेवा करणाऱ्या सैनिकांची मोठी संख्या आहे. देशसेवा करत असताना ५१ सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या स्मरणानार्थ शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक जिल्हा वासियांना प्रेरणा देणारे ठरेल. सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत. मुलांच्या वसतीगृहाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आला आहे. गतवर्षात  ५ कोटी रुपयांचे ध्वजदिन निधी संकलन करुन जिल्हा राज्यात अग्रेसर राहीला. यावर्षी आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांच्या निधीचे संकलन करण्यात आले असून गतवर्षीपेक्षा अधिकचा निधी संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

      सेवेतील सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न प्रशासनामार्फत अत्यंत संवेदनशीपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून  १६ ते ३० जून २०२५ दरम्यान जिल्ह्यात विशेष पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.  विविध यंत्रणांच्या सहभागाने सैनिकांचे व कुटूंबीयांचे प्रश्न या पंधरवड्यातून सोडविण्यात येणार आहेत. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत शहीद स्मारकाची अत्यंत कमी वेळेत अत्यंत दर्जेदार अशी उभारणी केल्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तसेच यासाठी सहकार्य केलेल्या सर्व संस्थाचे आभारही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी मानले. 

     ब्रिगेडियर सुनील कुमार म्हणाले,  देशवासियांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी शहीद सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण होण्यासाठी शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. सैनिकांनी त्यांचा परिवार, त्यांची स्वप्ने, घरातील सुख-सुविधा बाजूला सारत देशाच्या सुरक्षेला प्रधान्य दिल्यानेच आज आपण सुरक्षित आहोत. या शहीद स्मारकातून येणाऱ्या पिढ्या सैनिकांचे बलिदानचे नव्हे साहस, सन्मान आणि स्वतंत्रेच्या ताकदीची माहितीही यातून जाणून घेतील. सैनिकांच्या बलिदानाची जाण प्रत्येकाने मनी बाळगावी, असेही ते म्हणाले. 

     पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतर स्मरणात रहावे यासाठी उभारण्यात आलेले शहीद स्मारक हे जवानांच्या त्यागाची साक्ष आहे. जिल्हा प्रशासन व सेना विभागाच्या माध्यमातून शासनाच्या सहभागाने गावांना दत्तक घेऊन एक आदर्श मॉडेल गाव म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त करत माजी सैनिक व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक बैठक हिवरेबाजार येथे घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे म्हणाले, देश रक्षण करत असताना जिल्ह्यातील ५१ सैनिक शहीद झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ शहीद स्मारक उभे राहावे अशी नागरिकांतून मागणी होती. ती आज या निमित्ताने पूर्ण होत असून या स्मारकाच्या माध्यमातून शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण व प्रेरणा यातून मिळेल. देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव यातून होईल. माजी सैनिकांच्या व सैनिकांच्या कुटुंबीयांच्या अडचणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अत्यंत संवेदनशीलपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

 रोटरी क्लबचे डॉ.प्रसन्न देवचक्के, वीरपत्नी अंबिका भोंदे, यांनीही मनोगत व्यक्त केले.

    सर्वप्रथम मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सैन्यदलातर्फे शहिदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच शहीद स्मारकाच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर कल्याण संघटक चंद्रकांत शिंदे यांनी आभार मानले. 

    येत्या 16 ते 30 जून दरम्यान होणाऱ्या पंधराव्यामध्ये परिसरातील सर्व आजी माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्या व केसेसचा निपटारा केला जाईल. त्यासाठी प्रत्येक पीडित सैनिकांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यामध्ये आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह जमा करावे. त्यावरती तात्काळ निर्णय घेण्यात येईल.असे आवाहन मेजर उल्हारे यांनी केले.

    यावेळी मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांच्याशी चर्चा करून विस्तारपूर्वक चर्चेसाठी ऑफिसमध्ये बोलावलेले आहे. यावेळी अशोक चौधरी शिवाजी,पालवे,शिवाजी गर्जे, गोवर्धन गर्जे, शिवाजी वेताळ, मारुती ताकपेरे, गोरख पालवे, रावसाहेब काळे, कुशल घुले,प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब वर्पे,प्रकाश कोतकर,भाऊसाहेब रानमाळ वआजी-माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता, यांच्यासह हजारो सैनिक आदी उपस्थित होते.

Related Post