संघर्षनामा वृत्तसेवा। कर्जत,
दिनांक 29 नोव्हेंबर2024,
प्रतिनिधी - उज्वला उल्हारे.
मिरजगाव:- येथील रुरल एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये क्रांतीसुर्य, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील प्रा. डॉ. डी. एस. वडवकर यांनी आपल्या मनोगतामध्ये महात्मा फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करून सामाजिक जाणीवा जागृत ठेवल्या पाहिजेत, हीच खरी महात्मा फुले यांना श्रद्धांजली असेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. तानाजी जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महात्मा फुले यांच्या कृषी विषयक कार्याचा आढावा घेऊन समाजातील बहुसंख्येने असलेल्या शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने सामाजिक व आर्थिक समता निर्माण होणार नाही, त्यामुळे आजही महात्मा फुले यांच्या कृषी विषयक विचाराची देशाला गरज असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भूषण तागड यांनी केले, तर आभार प्रा. प्रेरणा बीटे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.