संघर्षनामा वृत्तसेवा l नगर
दि.१सप्टेंबर २०२४
भागवतराव गेनुजी काळे ( अण्णा ) यांना हसत खेळत वयाच्या 109 वर्षी देवाज्ञा झाली. आई वेनुबाई आणि वडील गेणुजी यांच्या पोटी अण्णांचा जन्म सहा जानेवारी 1915 ला सधन व राजकीय दृष्ट्या सजग असणाऱ्या जेऊर पंचक्रोशीतील बहिरवाडी येथील कुटुंबात झाला.एक भाऊ व तीन बहिणी सह आई-वडिलांचा परिवार अण्णांना लाभला . जेऊर परिसरातील एक कर्तुत्वान कुटुंब म्हणूनच या कुटुंबाकडे सदैव बघितले गेले. अण्णांची जन्मभूमी खडांबे असले तरी कर्मभूमी मात्र जेऊर पंचक्रोशी व सडे गावच राहिले.
अण्णाच्या वडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे मोठे बंधू भास्करराव गेनुजी काळे ( दादा ) व आई वेनू बाई यांच्या संस्कारातच अण्णांची जडणघडण झाली . दादा व अण्णांनी आपल्या बहिणीवर अपार प्रेम व माया केली.
मोठ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अण्णा हे दादांची सावलीच झाले. मोठे बंधू दादा राजकारणातील एक सजग व राजकीय दृष्ट्या परिपक्व असणारे व्यक्तिमत्त्वाला अण्णांनी कायम साथच दिली. त्यामुळे जेऊर पंचक्रोशीतच नाही तर नगर तालुक्याच्या राजकारणात भास्करराव काळे ( दादा ) यांचा एक वेगळा धबधबा निर्माण झाला होता . त्यांनी जेऊर ग्रुप ग्रामपंचायतीचे पंधरा वर्षे सरपंच पद व बहिरवाडी ग्रामपंचायतचे दहा वर्षे सरपंच पदा सह ते नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिले . हे सर्व अण्णांच्या पाठबळावरती दादांनी साध्य केले. दोन्ही भावांमधील प्रेम, जिव्हाळा , आपलेपण पाहून प्रत्येक जणाला आश्चर्य वाटत असे.
जिल्हा परिषद , पंचायत समिती , कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ व सहकारातील निवडणुकीत जेऊर पंचक्रोशीत अण्णा व दादा यांच्या शब्दाला कायमच मान राहिला होता.
लहानपणापासून अण्णांना व्यायाम , कुस्ती , वाचन यांची गोडी लागली होती. अण्णा सदैव मित्र परिवाराला मदत करण्यासाठी पुढाकार घेत असत. या दोन्ही बंधू अण्णा व दादांनी मोठ्या कष्टाने चार एकर जमिनीवरून 115 एकर जमीन खरेदी केली. उसाचे गुऱ्हाळ उभारले. उद्योग व्यवसायाची निर्मिती केली.
अण्णा व सुभद्रा आजीच्या पोटी सात मुले तीन मुली जन्माला आले. या सर्वांचे संगोपन अण्णांनी चांगल्या पद्धतीने केले. मुलांना व मुलींना चांगले संस्कार दिल्यामुळे या मुलांचे कर्तृत्व बहरले. त्यांच्या मुलांकडे आज प्रगतशील शेतकरी म्हणून बघितले जाते . काही मुले वनविभाग, महाराष्ट्र पोलीस या सेवेतून सेवानिवृत्त झाले . तर एक मुलगा वैद्यकीय सेवांमध्ये सेवा करत आहे . अण्णांचा परिवार मोठा आहे. सात मुले , तीन मुली, सुना , नातू नाती, पणतू अशा 73 व्यक्तींच्या परिवाराचे अण्णा आधारच होते .
अण्णांनी बहिरवाडीला पाणी समस्या असल्यामुळे राहुरी येथील सडे गावातील नातेवाईक पानसंबळ कुटुंबियांच्या मदतीने 1970 मध्ये 14 एकर जमीन खरेदी केली. त्यात त्यांच्या मुलांनी सडे गावांमध्ये आणखी 20 एकर जमीन खरेदी करून शेती व्यवसायाला आधुनिक पद्धतीचे रूप दिले . दूध व्यवसाय मध्ये देखील या कुटुंबाने प्रगती साधली आहे .
अण्णांनी मुलाप्रमाणेच आपल्या नातवांवर देखील चांगले संस्कार केल्यामुळे आज अण्णांचे नातू , नाती ,नात सुना , पुणे येथे आय टी मध्ये कार्यरत आहेत .एक नातू एल आय सी च्या मॅनेजर पदावर देखील कार्यरत आहे. अण्णा व दादांचा राजकीय वारसा त्यांचा नातू विलासराव यांनी समर्थपणे पेलला आहे . त्यांनी दहा वर्ष बहिरवाडी गावचे सरपंच पदावर काम केले आहे .त्यांनी जलसधारण , पाणलोट , वृक्ष लागवड क्षेत्रात केलेल्या कामामुळे बहिरवाडी ग्रामपंचायतीला त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार देखील बहिरवाडी ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. हे नातवांचे कर्तुत्व पाहून अण्णांना खूप समाधान वाटायचे.
गावांमधील खुंटावर असणाऱ्या अण्णा व दादांच्या वाड्याचे पुनर्निर्मितीचे काम नातवांनी जेव्हा हाती घेतले .तेव्हा अण्णांना खूपच आनंद झाला होता.
चौकट
पाच ज्ञानेंद्रिय , पाच कर्मेंद्रिय , पाच इंद्रियांचा विषय , पंच महाभूते , मन , बुद्धी , अहंकार आणि चित्त या 24 गुणांनी युक्त असणाऱ्या अण्णांचा देह जन्म अवस्थेपासून मृत्यूशय्ये पर्यंत सर्वच कर्तव्य कर्म करून वयाच्या 109 वर्षी जेव्हा पंचतत्वात विलीन झाला तेव्हा काळे परिवार वरती काळाचा आघात झाला. काळे परिवाराचा आधारवडच हरपला .
शब्दांकन
शरद एकनाथ दारकुंडे ( सर )
ग्रामीण राजकीय अभ्यासक