संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.६ मे २०२५
शिरूर कासार (वार्ताहर) : साहित्याची निर्मिती बुद्धीवादी, विचारवंत लोक करत असून त्यांच्याकडे समाज अपेक्षेने बघत असतो. आजवर ज्या चळवळी वा क्रांत्या झाल्या यामध्ये साहित्याचा महत्त्वपूर्ण वाटा होता. लेखनातून ज्यांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला त्यांना भरपूर त्रास झालेला दिसून येतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून थेट आजपर्यंत चा इतिहास पाहता या गोष्टीला पुष्टीच मिळते. साहित्यातील राजकारण अतिशय धोकादायक असून यातील गट तट, कंपू, टोळ्या, जातीयवाद, वशिलेबाजी यांना कंटाळून नाईलाजाने आपल्याला एकता फाउंडेशन ची निर्मिती करावी लागली असे प्रतिपादन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले. कवी रूपचंद दत्तोबा शिदोरे यांच्या शब्द प्रहार भावनांचे या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
निवृत्त पोलिस अधिकारी कवी सुभाष सोनवणे, निवृत्त आप्पर आयुक्त किसनराव लवांडे, नगरसेविक दिपाली बारस्कर, डाॅ.चंद्रकांत कदम, डाॅ.बाळकृष्ण मरकड, उद्योजक नवनाथ धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात पुस्तक प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी मंचावरील मान्यवरांनी कवी शिदोरे यांना पुस्तक प्रकाशनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आदर्श मोटरमन म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर लिखाणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा संकल्प केल्याचे शिदोरे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त याप्रसंगी काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनंत कराड, सुभाष सोनवणे, रूपचंद शिदोरे, एकता चे प्रदेश संघटक देवीदास शिंदे, शाहीर भारत गाडेकर, एकता फाउंडेशन पाथर्डी तालुकाध्यक्ष राजेंद्र उदारे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्रदीप बोडखे, उपाध्यक्ष आत्माराम शेवाळे, डाॅ.बेनझीर शेख, भोलानाथ देवकर, सुरेश वैरागकर, गोरख पवार आदी कवी कवयित्रींनी एकसे बढकर एक रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासर्व संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन एकता फाउंडेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी करत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला. यावेळी रूपचंद शिदोरे यांचे कुटुंबीय नातेवाईक, मित्र परिवार आणि एकता फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.