एकता फाउंडेशन संस्थेला राजधानीत पुरस्कार प्रदान, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते गौरव

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि २७ जानेवारी २०२६

शिरूर कासार (वार्ताहर) : गेल्या काही वर्षांपासून वेदनेला फुंकर माणुसकीची या ब्रीदवाक्याचा सन्मान राखत शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याचे माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री मा.आशिष शेलार यांच्या हस्ते बांद्रा(प.) मुंबई येथील नॅशनल बुक लायब्ररीमध्ये विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने आयोजित समारंभात एकता फाउंडेशन संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी विले-पार्लेचे आमदार मा.पराग अळवणी, संमेलनाध्यक्ष किरण येले, संत साहित्याच्या अभ्यासिका रेखा नार्वेकर, विश्वभरारीच्या अध्यक्षा तथा संमेलनाच्या आयोजिका सौ.लता गुठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         दि.२५ जानेवारी रोजी विश्वभरारी फाउंडेशनच्या वतीने एकदिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात एकताचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, मार्गदर्शक प्रा.डाॅ.भास्कर बडे यांनी हा सन्मान स्विकारला. एकता फाउंडेशन ने आजपर्यंत कसलाही भेदभाव न करता सामाजिक एकात्मतेचे नाते जोपासत, समाजापासून दुर्लक्षितांचे अश्रू पुसून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचा यथोचित सन्मान झाल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विश्वभरारी च्या संस्थापिक मा.लता गुठे आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने विशेष परिश्रम घेतले.

         एकता फाउंडेशन संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड (मुंबई), वाल्मिक गुठे (पार्ले), रजनी ताजने (डहाणू), निर्मला शेवाळे (चेंबूर), प्रा.डाॅ.जयद्रथ जाधव (लातूर), कवीवर्य प्रभाकर साळेगावकर (माजलगाव), मराठवाडा साहित्य परिषद शिरूर कासार व तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकताचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांचे अभिनंदन केले आहे.

Related Post