संघर्षनामा वृत्तसेवा ।श्रींगोंदा
दि . २० जानेवारी २०२६
प्रतीनिधी ,
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना अंतर्गत उखलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिस्त निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासाचा भोंगा या अभिनव उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावात दररोज संध्याकाळी ठीक 7.00 वाजता अभ्यासाचा भोंगा वाजवण्यात येत असून, संध्याकाळी 7 ते 9 हा वेळ केवळ अभ्यासासाठी राखून ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद ठेवून मुलांनी शांतपणे अभ्यास करावा, असे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या प्रारंभानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी गावात पाहणी केली असता, बहुसंख्य घरांमध्ये विद्यार्थी शांतपणे अभ्यास करताना दिसून आले. हे चित्र समाधानकारक असून, पालकांचा सकारात्मक सहभाग, मुलांची शिस्त आणि गावाची एकजूट यांचे दर्शन घडले.
या उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना छोटी बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्याची सूचनाही काही ग्रामस्थांकडून मांडण्यात आली आहे.
दरम्यान, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, युवक व ग्रामस्थांची एक मार्गदर्शक टीम घरोघरी भेटी देत पालक व विद्यार्थ्यांना समुपदेशन तसेच अभ्यासासाठी प्रोत्साहन देत आहे.
या अभिनव उपक्रमाचे माननीय गटविकास अधिकारी राणी फराटे मॅडम व विस्तार अधिकारी यादव यांनी विशेष कौतुक केले असून, हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आज अभ्यासाची शिस्त, उद्या यशाची खात्री या संदेशासह सुरू झालेला हा उपक्रम उखलगावच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले आहे.