संघर्षनामा वृत्तसेवा ।श्रीगोंदा
दि . १४ जानेवारी २०२६
प्रतिनिधी ,
ढवळगाव श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला परिसरात भरदिवसा बिबट्याने थेट मानवी वस्तीच्या सान्निध्यात हल्ला चढवत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मेंढपाळ राम आढाव यांच्या ऊसाच्या शेतालगत शेळ्या-मेंढ्या चारत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत धोंडीभाऊ भगवंता शिंदे यांच्या डोळ्यासमोरच एका शेळीवर हल्ला केला. नरडीचा घोट घेत बिबट्याने क्षणातच त्या शेळीला फरफटत दाट ऊसाच्या शेतात ओढून नेले. हा थरारक प्रसंग पाहून परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत.
घटना इतकी अचानक व भीषण होती की आरडाओरड करूनही बिबट्याने कुठलीही भीती न बाळगता शेळीला उचलून नेले. हा प्रसंग पाहून मेंढपाळ भयभीत झाला. परिसरात ऊस, दाट झाडी व गवत मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला मुक्त संचार मिळत असून तो मानवी वस्तीत सहज शिरकाव करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या परिसरात यापूर्वीही बिबट्या दिसल्याच्या घटना घडूनही ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लहान मुले, महिला व शेतमजूर जीव मुठीत धरून वावरत असून संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी संबंधित ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, केवळ पिंजरा लावून समस्या सुटणार नाही. रात्रीची गस्त वाढवणे, परिसरात उजळणी करणे तसेच कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम व आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट
घटनेनंतर सरपंचांनी वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने पिंजरा लावण्याची तातडीची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी दिपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची पथके परिसरात तैनात करण्यात आली असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यंत सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरपंच मोहनराव आढाव
चौकट
एकटे शेतात जाणे टाळा. जनावरे उघड्यावर सोडू नका. संध्याकाळनंतर लहान मुलांना घराबाहेर पाठवू नका. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी.
— चंद्रकांत मरकड, वनरक्षक