पेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विनोद पोपट म्हस्के यांची बिनविरोध निवड

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२७ डिसेंबर २०२५

पेडगाव प्रतिनिधी ,

पेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विनोद पोपट म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच रामहरी ढगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. या सभेत शांततेत, लोकशाही पद्धतीने व सर्वानुमते विनोद पोपट म्हस्के यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

या निवडीमुळे पेडगाव ग्रामपंचायतीला नवे व कार्यक्षम नेतृत्व लाभले असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

उपसरपंचपद रिक्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीने नियमानुसार विशेष सभा आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच इरफान भाई पीरजादे होते. निवड प्रक्रियेसाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून महांडुळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले. त्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध, पारदर्शक व शांततेत पार पडली.

या सभेला ग्रामपंचायत सदस्य, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान विनोद पोपट म्हस्के यांचे नाव सुचविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची, गावासाठी असलेल्या तळमळीची व सर्वसामान्यांशी असलेल्या जवळच्या नात्याची दखल घेत सर्व सदस्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. अन्य कोणतेही नामनिर्देशन न आल्याने विनोद पोपट म्हस्के यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. निवड जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

नवनिर्वाचित उपसरपंच विनोद पोपट म्हस्के हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, शिक्षण, शेतकरी व युवकांचे प्रश्न यावर त्यांनी सातत्याने काम केले आहे. गरजू नागरिकांना मदत करणे व विकासकामांचा पाठपुरावा करणे ही त्यांची ओळख आहे.

निवडीनंतर बोलताना विनोद पोपट म्हस्के म्हणाले,

उपसरपंचपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली, हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे. या जबाबदारीला मी पूर्ण प्रामाणिकपणे न्याय देईन. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन पेडगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.

या निवडीबद्दल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हरिदास (आबा) शिर्के, शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजू पाटील जगताप, सरपंच इरफान भाई पीरजादे, रामहरी ढगे, माजी सरपंच हसन शेख, डॉ. शेख, इस्माईल पीरजादे, सामाजिक कार्यकर्ते दीपक म्हस्के तसेच ग्रामपंचायत सदस्य युवराज शिंदे, अशोक गोधडे, नंदकुमार कंगने, सलीम तांडेल, रिजवाना आतार, सोनम पीरजादे, रेश्मा तांडेल, योगिता गोधडे, शारदा कंगने यांचे मनापासून आभार मानले.

पेडगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन भक्कम असून तालुका अध्यक्ष हरिदास (आबा) शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ग्रामपंचायत पातळीवर मजबूत बांधणी केली आहे. विनोद म्हस्के यांची निवड ही संघटनात्मक कामाचे फलित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सरपंच इरफान भाई पीरजादे यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करत सांगितले की,

रामहरी ढगे यांनी ग्रामपंचायतीसाठी चांगले काम केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर विनोद म्हस्के यांच्यासारख्या कार्यक्षम व्यक्तीची निवड झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे काम अधिक गतिमान होईल.

या वेळी तालुका अध्यक्ष हरिदास (आबा) शिर्के, राजू पाटील जगताप, सरपंच इरफान भाई पीरजादे, रामहरी ढगे, माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते दीपक म्हस्के, युवक कार्यकर्ते सुभाष दिवटे, विठ्ठल म्हस्के, मयूर घोडके, सौरभ वंशीव, तुषार म्हस्के, सनी म्हस्के, विशाल म्हस्के, प्रवीण म्हस्के यांच्यासह महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post