अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओंकार ग्रुपचा एक कोटींचा हातभार

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.८ ऑक्टोबर २०२५

प्रतिनिधी, 

राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतमालाचे नुकसान, पिकांचे व घरांचे नुकसान, तसेच उपजीविकेचा आधार हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडलाआहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओंकार ग्रुपने पुढाकार घेत एक कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे.

ही मदत रक्कम मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दादा भुसे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि यामिनी पाटील यांच्या उपस्थितीत ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, संचालिका रेखा बोत्रे पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द केली .

या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओंकार ग्रुपच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत सांगितले की, आपत्तीच्या काळात उद्योग क्षेत्रानेही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजाप्रती जबाबदारी आहे. ओंकार ग्रुपने दाखवलेला पुढाकार प्रेरणादायी आहे.

ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी यावेळी सांगितले की, शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्याच्यावर संकट आले असताना मदतीचा हात देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उभारणीसाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.

या मदतकार्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये ओंकार ग्रुपबद्दल कौतुकाचे सूर उमटले असून, सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेचा उत्तम आदर्श या उपक्रमातून घालण्यात आला आहे.

Related Post