संभाजी ब्रिगेड पक्ष सर्व निवडणुका ताकदीने लढणार - इंजि. शामभाऊ जरे

संघाच्या वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१९ ऑक्टोबर २०२५

प्रतिनिधी,

दिवाळीनंतर लगेचच नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजी. शामभाऊ जरे यांनी दिली.

२०१९ साली नवीनच पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड पक्षाने श्रीगोंदा विधानसभा तसेच नगरपरिषद निवडणुका लढवून आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले होते. त्या वेळी नवीन पक्ष असूनदेखील पक्षाच्या उमेदवारांनी अनेक मातब्बर उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवत जनतेत आपली छाप पाडली होती.

२०१९ च्या निवडणुकांपासून आजपर्यंत संभाजी ब्रिगेड पक्षाने संघटनात्मकदृष्ट्या मोठी झेप घेतली आहे. विचारांच्या बळावर आणि कार्यसंघटनेच्या माध्यमातून पक्षाने आपली ताकद अनेक पटींनी वाढवली आहे. विविध आघाड्या स्थापन करून जेष्ठ नागरिक, महिला, युवक, कामगार, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी आणि शेतकरी यांना पक्षात सहभागी करून घेण्यात यश मिळाले आहे.

दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना जाहीर पाठिंबा देऊन संभाजी ब्रिगेड पक्षाने प्रत्येक सभेत आपल्या ठाशीव शैलीत विविध मुद्द्यांवर जनतेचा आवाज बुलंद केला. या प्रचारात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंहाचा वाटा उचलून खासदार लंके यांच्या विजयात महत्वाचा सहभाग नोंदवला.

याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष माजी आमदार राहुल दादा जगताप यांना मोठ्या मेळाव्यातून जाहीर पाठिंबा देत, आघाडीच्या उमेदवाराला मागे टाकत पक्षाची ताकद स्पष्टपणे दाखवून दिली.

आगामी निवडणुकांमध्ये मांडवगण (२ गण), आढळगाव (२ गण), कष्टी (२ गण) या जिल्हा परिषद गटांत तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेत संभाजी ब्रिगेड पक्षाने उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

भानगाव पंचायत समिती गणासाठी इंजि. शामभाऊ जरे हे प्रबळ दावेदार असून, काष्टी गणासाठी उपाध्यक्ष प्रफुल्ल उर्फ बापु जगताप,आढळगाव गटात शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज यांच्या सौभाग्यवती तर श्रीगोंदा नगरपरिषद प्रभाग क्र. ४ साठी उपाध्यक्ष दिलीप लबडे व प्रभाग क्र. २ साठी सचिव सुयोग धस यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. इतर ठिकाणीही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक असून, योग्य व पात्र व्यक्तींना संधी देण्यात येणार असल्याचे इंजि. जरे यांनी सांगितले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील अनुभव, संघटनेचे बळ आणि मिळालेला जनसमर्थन यांच्या जोरावर संभाजी ब्रिगेड पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये निश्चितपणे मोठे यश मिळवेल, असा ठाम विश्वास संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी व्यक्त केला.

Related Post