संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीनेसातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.
शिवजन्मोत्सवाच्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरु होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा,जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो.
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, अशा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरु होते. माॅं जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करुन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करुन मावळ्यांची फौज तयार केली; यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरु करुन स्वराज्य स्थापनेतून खऱ्याअर्थाने भारताचा आत्मभिमान जागृत केला. आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत.
येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. यातून प्रेरणा घेऊन राज्याची सेवा करण्याकरीता आम्ही येथे येतो. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असे श्री. फडणवीस म्हणाले.