संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मस्थळी किल्ले शिवनेरी, जुन्नर, पुणे येथे संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित शिवप्रेमींना संबोधित केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम जगभरातील तमाम शिवप्रेमींना शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 2030 साली छत्रपती शिवरायांची 400 वी जन्मजयंती साजरी होणार आहे. शिवजन्मस्थळी असलेल्या या शिवनेरीच्या मातीत आल्यावर स्वराज्याची स्फूर्ती आणि तेज मिळते, ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करत आहोत, अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्वराज्याची स्थापना करून संपूर्ण भारत देशाचा आत्माभिमान जागवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते. राज्यकारभार कसा करावा याची मानके महाराजांनी स्थापन केली. पर्यावरण व जलसंवर्धन यासंदर्भात महाराजांनी केलेले कार्य आजही दिशादर्शक आहे. अनेक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवरायांनी केलेले व्यवस्थापन आजही मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे व्यवथापन शास्त्राचे गुरु होते म्हणून त्यांना आपण जाणता राजा म्हणतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स स्थापन केला असून किल्ल्यांवर असलेली अतिक्रमणे काढून टाकली जाणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवप्रेमींना आश्वासित केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून राज्य शासनाच्या सुरु असलेल्या कामाची विस्तृत माहितीही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच राज्य पोलिसांच्या तुकडीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देखील अर्पित केली. यावेळी शिवकालीन साहसी खेळांचेही प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर संपन्न झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.