संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंबेगाव, पुणे येथे शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून, साकार झालेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्याच्या लोकार्पणाची संधी मिळाली. आजचा दिवस अत्यंत धन्य अशा प्रकारचा असून या शिवसृष्टीचे सुंदर कार्य बघून निःशब्द झालो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
या शिवसृष्टीमध्ये साकारण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराची भव्यता, गंगासागर तलाव आणि स्वदेश, स्वधर्म व स्वभाषेच्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेगवेगळ्या देशातून आणलेले अतिशय दुर्मिळ छायाचित्र, याच त्रिसूत्रीवर आधारित 360 डिग्री प्रकारची टाईम मशीन आणि या टाईम मशीनमुळे मिळालेली प्रेरणा व तयार झालेली भावना अवर्णनीय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाचे व प्रेरणादायी प्रसंग या शिवसृष्टीमध्ये मांडण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक म्हणून आपण या शिवसृष्टीकडे पाहू शकतो. स्व. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील आज स्वर्गातून शिवाशीर्वाद देत असतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ही शिवसृष्टी प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या योग्या प्रमाणे स्वराज्यासाठी लढले. ही शिवसृष्टी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसृष्टीचे काम हे राष्ट्रकार्य असून ते अधिक वेगाने व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ₹50 कोटींच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
यावेळी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. डॉ. मेधा कुलकर्णी, मंत्री अॅड. आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. विजय शिवतारे, शिवसृष्टीचे विश्वस्त व अध्यक्ष जगदीश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.