संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.८ फेब्रुवारी २०२५
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात मोठी ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या लिंपणगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे अकार्यक्षम असून मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार करत आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याने गावच्या विकास कामांना मोठी खिळ बसली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. विकास कामांकडेही ग्रामविकास अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून वेळोवेळी अनुपस्थितीत राहत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे रखडले जात आहेत. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने व समक्ष भेटून देखील ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ग्रामसेवकावरील कारवाई संदर्भात लवकरच गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेणार असल्याचे युवक कार्यकर्ते विजय धनंजय ओहोळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गटविकास अधिकारी श्रीगोंदा यांना दिलेल्या निवेदनात विजय ओहोळ यांनी म्हटले आहे की; लिंपणगाव येथील सन 2017 -18 या आर्थिक वर्षात पंचायत समितीमार्फत गावामध्ये ए आर ओ फिल्टर बसवण्यात आले; तेव्हापासून आजपर्यंत ग्रामसेवकाला गटविकास अधिकारी यांना वारंवार अर्ज करून तसेच माहितीचा अधिकारात अर्ज देऊन देखील ए आर ओ फिल्टर चालू करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. तरीदेखील ए आर ओ फिल्टर चालू झालेला नाही. या कामासाठी ग्रामविकास अधिकारी तत्पर नाही. फिल्टर चालू होत नाही. व कोणतेही विकास कामे होत नाहीत. सद्यस्थितीला दलित वस्ती मधील सार्वजनिक पाईपलाईन सध्या बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या दलित वस्तीत विहिरींना पाणी असून; देखील महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याला समक्ष भेटल्यानंतर त्यांच्याकडून उद्धटपणे ग्रामस्थांना भाषा वापरली जाते. तसेच गावातील अनेक सिटीसर्वेच्या जागे संदर्भात न्यायालयात वाद चालू आहेत. त्या संदर्भात ग्रामविकास अधिकारी जाणूनबुजून तारखांना हजर राहत नाही. न्यायालयाचा देखील ग्रामविकास अधिकारी अवमान करतात. त्यामुळे अशा या अकार्यक्षम ग्रामविकास अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा अन्यथा निलंबित करण्यात यावे; पाच दिवसात गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्धार विजय ओहोळ यांच्यासह ग्रामस्थांनी घेतला आहे.
चौकोनात घ्यावे
न्यायालयाची नोटीस असूनही ग्रामसेवकाची अनुपस्थिती!
दरम्यान लिंपणगावातील ज्या नागरिकांच्या सिटीसर्वे संदर्भात न्यायालयात वाद सुरू आहे ग्रामपंचायतीचे म्हणणे मांडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना रीतसर वकिलामार्फत न्यायालयाची समन्स बजावून देखील वेगवेगळी कारणे दाखवून न्यायालयात देखील ग्रामविकास अधिकारी श्री धायगुडे उपस्थित राहत नाही या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकाला सूचना देऊन देखील न्यायालयाकडे फिरकत नाही. सरपंच; उपसरपंच तसेच सदस्य यांनी सूचना मांडल्यानंतर त्यांचेही प्रश्न सोडवत नाही. ग्रामसभेच्या ठरावाचे ही ग्रामसेवकाकडून कार्यवाही होत नाही. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाचे देखील ग्रामसेवकाकडून पालन होत नाही. त्यामुळे ग्रामसेवकाची तातडीने बदली करावी अन्यथा त्याला निलंबित करावे; अशी मागणी युवक कार्यकर्ते सतीश काशिनाथ भगत यांच्यासह ग्रामस्थांनी केली असून या संदर्भात लवकरच जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भेटणार असल्याचे विजय ओहोळ व सतीश काशिनाथ भगत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.