संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३डिसेंबर २०२४
प्रतिनिधी,
जनतेला अन्न धान्य पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशनकार्ड संबंधी कामे तात्काळ व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण केली ही जरी चांगली गोष्ट असली तरी या प्रणाली मुळे रेशनकार्ड संबंधी अनेक कामे अडकून पडलेलीअसुन जनतेच्या मूळ प्रश्ना कडे तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष असुन अन्नधान्य पुरवठा विभाग दलाल आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहेअश्या अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मांडणार तालुक्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीचा वास्तविक लेखाजोखा या मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी व सामाजिक प्रश्न समोर येत आहेत. रेशनकार्डच्या प्रश्नांसंदर्भात युनिटी ऑफ मुलनिवासी समाज संघटनेचे संजय सावंत यांच्या वतीने पुरवठा निरीक्षक अधिकारी ज्ञानेश कोरे यांना आज दि. ३ रोजी निवेदन देण्यात आले त्याचबरोबर संबंधित अर्जावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संघटनेकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
सविस्तर माहिती घेतल्यानंतर जनतेच्या समस्या व प्रशासकीय यंत्रणा यांच्यातील विविध त्रुटी समोर येत आहेत, तालुक्यातील शिधापत्रिका धारकांची त्या संबंधीत कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत ऑनलाइन पद्धतीमुळे सर्वसामान्य जनतेस अनेक अडचणी निर्माण होत आहेत रेशन कार्ड मधील त्रुटींमुळे गेली वर्षभर सामान्य नागरीक महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विषयी, लाडकी बहीण योजना, घरकुल योजना, विद्यार्थ्याच्या विविध शिष्यवृत्ती योजना या सह अनेक योजनां पासून वंचीत रहावे लागत आहे. याचाच अर्थ आपली संगणकीय प्रणाली असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच आहे असे म्हणावे लगेल असे दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.
सदर तक्रार अर्जावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास युनिटी ऑफ मुलनिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पुरवठा निरीक्षक अधिकारी ज्ञानेश कोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे संजय सावंत, सुरेश रणवरे, सुभाष बोराडे, समीर शिंदे, सचिन भोसले, विजय गायकवाड, धनंजय सोनवणे, शिवसेना उद्धव ठाकरे गट भटक्या विमुक्त तालुका अध्यक्ष सुदाम सावंत, संतोष सावंत, मोहन शिंदे, सुदाम भगवान सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
संगणकीय कार्यप्रणालीच्या नावाखाली प्रशासकीय कर्मचारी नागरीकांची दिशाभूल करून योग्य माहीती न देता पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीत सुधारणा व्हावी.
संगणकीय प्रणाली व्यवस्थीत कार्यान्वीत होईपर्यंत रेशन कार्ड संबंधी सर्व कामे ऑफलाईन पद्धतीने चालू करून नागरीकांना दिलासा द्यावा - संजय सावंत, राज्य संयोजक युनिटी ऑफ मुलनिवासी समाज
चौकट
मागील तीन महिन्यांपासूनची माहिती अशी आहे की तालुक्यातील २ लाख २ हजार ५६० लोक संख्येमध्ये आतापर्यंत ५३ हजार ५६५ रेशन कार्ड ऑनलाइन झालेले आहेत नवीन रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी अनेक अडचणी आहेत त्यामध्ये सर्व्हर बंद पडणे, वेबसाईट चालू नसणे, विद्युत पुरवठा खंडित होणे अशा समस्या आहेत - ज्ञानेश कोरे, पुरवठा निरीक्षक अधिकारी श्रीगोंदा.
(वरील महिती तांत्रिक दृष्ट्या जरी वास्तविक वाटत असेल पण यासाठी जबाबदार कोण याबाबत रेशनकार्ड संदर्भात संगणकीय ऑनलाइन पद्धत कशी चालते याबद्दल अधिकमाहिती देण्याचे मात्र त्यांनी टाळले)