महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मांडणार श्रीगोंदा तालुक्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीचा वास्तविक लेखाजोखा-माधव बनसुडे

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२६नोव्हेंबर २०२४

प्रतिनिधी,

श्रीगोंदा तालुक्यातील कार्यरत विविध विभागाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीचा वास्तविक लेखाजोखा श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून लवकरच जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे माहिती पत्रकार संघाचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष माधव बनसुडे यांनी दिली.

जन हितासाठी आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना आणत असते त्या आधारे करोडो रुपयांचा निधी वर्ग करत असते असच तालुक्यात घडत असताना मात्र याबाबत पारदर्शक कारभार कशा पद्धतीने चालतो याबाबतची प्रत्येक विभागानुसार वास्तविक माहिती जनतेला कळावी आणि जनतेचा आणि प्रशासनाचा थेट समन्वय यावा हा या मागचा मूळ उद्देश असून यामध्ये जे दोषी,दप्तर दिरंगाई किंवा कागदावरच योजना गिळंकृत करणारे अधिकारी यांची पोलखोल सुद्धा केली जाणार आहे .

दरवर्षी तालुक्याच्या विविध विकासासाठी भरगच्च निधी येऊनही परिस्थिती बदललेली नाही.कुकडी, घोडच्या पाण्यात अनागोंदी , तहसील प्रशासनात दिरंगाई, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्याला पट्टी, पंचायत समितीमध्ये दिशाहीन कार्यपद्धती ,वनविभागाचा बेजबाबदारपणा,आरोग्य विभागाला कायमच ग्लानी, सब रजिस्टर कार्यालय दलालांच्या विळख्यात,सबब तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा अनागोंदीच्या फेरीत असल्याचे जनतेच्या माध्यमातून सांगितले जात असल्याने या सर्वच कार्यालयाची माहिती आणि जनतेच्या थेट प्रतिक्रिया घेऊन जशास तशा प्रसारीत केल्या जाणार आहेत.

आपल्या परिसरातील विकास कामे होत असताना दिरंगाई होते का? गुणवत्तेत तडजोड केली जातेय का? ग्रामपंचायत ते तालुका स्तरावर कोणत्या विभागात आडवनुक होते, कोठे अन्याय होतोय याबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाणार असून ठोस पुराव्यानिशी अधिकारी पदाधिकारी आणि जनता याचा समन्वय साधून प्रशासकीय कार्यपद्धतीचा लेखाजोखा सादर केला जाणार आहे .

याबाबत सुज्ञ नागरिकांनी, युवांनी,सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका अध्यक्ष माधव बनसुडे यांनी केले आहे.

Related Post