संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.५ नोव्हेंबर २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लोणी व्यंकनाथ मध्ये गेल्या एक वर्षापासून गाव व वाड्यावर बिबट्यांनी धुमाकूळ घालत गोठ्यातील पाळीव जनावरांवर हल्ला करून मोठी दहशत माजवले आहे. या प्रश्नासंदर्भात लोणी व्यंकनाथ परिसरात बिबट्याची दहशत कायम असून शेतात काम करणारी शेतमजूर व शेतमालक शेतामध्ये काम करण्याचे धाडस करत नाही. या प्रकारामुळे शेतीची मोठी वाहतात होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे शेती उद्योग ठप्प झाल्याच्या भावना लोणी व्यंकनाच्या ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत. या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधूनही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
लोणी व्यंकनाथ येथील बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास दोन दिवसांमध्ये चार शेळ्या व अनेक पाळीव कुत्र्यांचा देखील बळी घेतल्याच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या घटने संदर्भात वृक्षमित्र बाळासाहेब जठार यांनी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्याशी बिबट्याच्या संदर्भात संपर्क साधून माहिती दिली असता पत्रकार कुरुमकर यांनी वनक्षेत्रपाल रंजना घोडके व वन कर्मचारी संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून तातडीने घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना देताच. वन कर्मचारी संभाजी शिंदे हे लोणी व्यंकनाथ येथे ५ नोव्हेंबर रोजी वृक्षमित्र बाळासाहेब जठार यांच्या वस्तीवर हजर झाले. तेथे स्वतः सामाजिक बांधिलकी समोर ठेवून ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे देखील उपस्थित राहिले. या पत्रकारांच्या धाडसी निर्णयामुळे शेतकऱ्यांनी पत्रकार यांना धन्यवाद दिले आहेत. श्री जठार यांच्या तुर व निंबोणीच्या झाडामध्ये हल्ला केलेल्या शेळ्या व कुत्र्यांचे काही अवशेष आढळून आले. या हल्ला केलेल्या पाळीव प्राण्यांचे अवशेषाचे वन कर्मचारी श्री शिंदे यांनी फोटो काढून वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती भगत व वनक्षेत्रपाल श्रीमती रंजना घोडके यांच्याकडे अहवाल सादर करून तातडीने सदर अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल; असे आश्वासन व न कर्मचारी श्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी व पत्रकारांना सांगितले.
चौकट
दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरापासून बिबट्याचे प्रमाण लोणी व्यंकनाथ परिसरात वाढत असून रात्री अपरात्री बिबटे प्राण्यांच्या गोठ्यात व वाड्या वस्तीवर येऊन बिबटे हल्ला करीत आहेत. यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबद करण्यात यावे. तरच या परिसरात बिबट्याची दहशत कमी होईल; अन्यथा शेतमजूर; शेतीमालक लहान बालके हे सुरक्षित राहू शकतील; या घटनेची जबाबदारी देखील वनविभागाला स्वीकारावी लागेल ;अन्यथा या घटनेत केव्हाही एखाद्याचा बळी जाऊ शकतो. अशा तीव्र भावना देखील वृक्षमित्र बाळासाहेब जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.