एकताच्या व्यासपीठावरून साहित्याचा जागर-विलास सिंदगीकर

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.८जून २०२४

शिरूर कासार (वार्ताहर) : गेल्या एक दशकापासून एकता फाउंडेशन शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. मी स्वतः या गोष्टीचा साक्षीदार असून ग्रामीण भागात अशी चळवळ उभी करून ती जिवंत ठेवणे हे काम दिसते तेवढे सोपे नाही. एकताची घोडदौड पाहता फाउंडेशन च्या सर्वच पदाधिकाऱ्यांसह सभासद व कार्यकर्ते अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य तथा म.सा.प.संभाजीनगर कार्यकारिणी सदस्य मा.विलास सिंदगीकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 19 वे राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनात ते उद्घाटक पदावरून बोलत होते.

         सुप्रसिद्ध साहित्यिक तथा बबन, ख्वाडा, छत्रपती शासन, रौंदळ सारख्या चित्रपटांचे गीतकार सुप्रसिद्ध कवी डाॅ.विनायक पवार काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, विभागीय युवक संघटक ह.भ.प.सुनील महाराज केकाण यांची प्रमुख उपस्थिती होती. एकताच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तालमणी हरिप्रसाद गाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर एकता फाउंडेशन जामखेड तालुकाध्यक्ष परशुराम नागरगोजे यांनी काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.

         या संमेलनात सुनंदा शिंगनाथ (पुणे), स्वाती पाटील (आहिल्यानगर), शंकरराव मालोदे (संभाजीनगर), ज्ञानेश्वर हंडरगुळीकर (लातूर), प्राचार्य चंद्रशेखर कळसे (जळकोट) या निमंत्रित मान्यवरांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. एकता चे कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. बारामतीचे सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांनी या कविसंमेलनामध्ये उपस्थित राहून रसिक श्रोत्यांना मार्गदर्शन करत आपली एक रचनाही ऐकवली. एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे व कवीवर्य इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. राज्यभरातून अनेक कवींनी या काव्यसंमेलनात श्रोते म्हणून हजेरी लावली.

Related Post