संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा
दि.५ जानेवारी २०२५
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सातारा येथे संपन्न झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दलित महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी ठराव क्रमांक ८ चे वाचन केले. या ठरावात नमूद करण्यात आले की, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, मराठी माणूस, राष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी अण्णा भाऊ साठे यांनी अमूल्य योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी अग्रणी भूमिका बजावली. जागतिक कीर्तीचे लेखक व कलावंत असलेल्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी या साहित्य संमेलनाने केली आहे.
या ठरावाचे सूचक स्वागताध्यक्ष व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले होते, तर अनुमोदक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. ठरावाचे वाचन होताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले.
या ऐतिहासिक ठरावाबद्दल दलित महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील (पाणीपतकार), स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे आभार मानण्यात आले. या सर्वांनीच प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे व दलित महासंघाच्या मागणीला सुरुवातीपासून सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
ठराव मंजूर झाल्यानंतर दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, उत्तर जिल्हाध्यक्षा मंदाकिनी मेंगाळ, जिल्हाकार्याध्यक्ष कडूबाबा लोंढे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सकटे, तालुकाध्यक्ष रफिक शेख आदी पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर येथील सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या ठरावामुळे महाराष्ट्रातील जनभावनेचा सन्मान राखत आता राज्य सरकार केंद्र सरकारकडे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव सादर करू शकणार आहे.