पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.८ नोव्हेंबर २०२५

अहिल्यानगर प्रतिनिधी,

 एकात्मिक आदिवासी प्रकल्प, राजूर यांच्या मार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी चार महिन्यांच्या कालावधीचे मोफत पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी (ता. अकोले) येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

हे प्रशिक्षण १ डिसेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. अर्जासोबत १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवासी दाखला किंवा रेशनकार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १८ ते २६ वर्षांदरम्यान असावे. वजन किमान ५० किलो व उंची किमान १६५ सेंमी असावी.

निवड प्रक्रियेत शारीरिक क्षमता चाचणी (८०० मीटर धावणे) आणि लेखी परीक्षा प्रत्येकी ५० गुणांच्या असतील. दोन्ही मिळून एकूण १०० गुणांची परीक्षा होईल. उमेदवारांची निवड मेरिटनुसार करण्यात येईल. ऑफलाइन अर्ज केवळ २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंतच स्वीकारले जातील. त्यांनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनी परीक्षेसाठी दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी (ता. अकोले) येथे मूळ व छायांकित कागदपत्रांसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ अथवा ८८०५६९८९४५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Related Post