संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी भव्य शिवजयंती आनंदात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. सचिन धेंडे उपस्थित होत्ते. त्यांनी आपल्या व्याख्यानात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांगीण इतिहास उजागर केला.छत्रपती शिवाजीमहाराजांचे कार्य हे सर्वव्यापी होते. त्यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्याची उभारणी करून ते स्वराज्य संस्थापक बनले. शेतकरी कष्टकरी समाजातून अद्वितीय योद्धे तयार करून त्यांच्यामध्ये स्वराज्याचा विचार पेरला. स्वराज्यासाठी आत्मआहुतीच्या प्रेरणा निर्माण केल्या. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व त्याची तात्काळ अंमलबजावणी हे त्यांच्या शासनाचे वैशिष्ट्य होते. दुष्काळात शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची तगाई कर्ज पुरवठा करून सावकारांच्या जाचातून मुक्त केले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशी सक्त ताकीद सैनिकांना दिली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते शेतकरी कष्टकरी यांचे पोशिंदा होते. शिवचरित्र हे विज्ञानवादी, समतावादी विचारांनी भरलेले असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती प्रगल्भ व सुधारणावादी भूमिकेचे होते याची जाणीव करून दिली. स्वराज्य हे त्यागातून उभे राहिलेले होते. आयुष्यात शिवरायांचा एक गुण स्वीकारला तरी आपण यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे शिवरायांचे गुण अंगिकारावेत असे आवाहन विद्यार्थ्याना केले. कार्यक्रमाच्या प्रारंभ प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी सर ,सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुरेश रसाळ सर , उपप्रचार्य प्रा. चंद्रभान कातोरे सर, पर्यवेक्षक प्रा. प्रवीण टकले सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चंद्रभान कातोरे, पर्यवेक्षक प्रा. प्रवीण टकले, विज्ञान विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. राजेश शिर्के उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. राजेश बाराते यांनी केले तर आभार प्रदर्शन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. मन्मथ लोहगावकर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण नागवडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक श्री. भास्कर वांगणे, श्री. गोरक्ष नागवडे, श्री. संजय दांडेकर यांनी विशेष सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्याख्यान कार्यक्रमानंतर शिवविचारांचा जागर करण्यासाठी रसायनशास्त्र प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मनोहर सूर्यवंशी, प्रा. मिलिंद बेडसे, प्रा. कोमल कांबळे यांनी प्रभातफेरीचे आयोजन केले. सदर रॅलीचे संयोजन प्रो. डॉ. संदीप कदम, प्रा.डॉ. मन्मथ लोहगावकर, प्रा. डॉ. शिवाजी नेटके, प्रा. डॉ. प्रवीण पिसे, प्रा.मिथिल वाईगडे प्रा. दीपाली गायकवाड, प्रा. वैभवी साबळे , प्रा. राजश्री भागवत,श्री.अनिल काकडे, श्री. दत्ता शिंदे , श्री. बाबासाहेब शिंदे यांनी केले.