संघर्षनामा वृत्तसेवा। कर्जत
दि.9 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी, उज्वला उल्हारे
राशीन : राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या राशीनच्या जगदंबादेवीच्या ( यमाईदेवी ) दोन किलोच्या सुवर्ण मुखवटा चल प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने होत असलेल्या शतचंडी यज्ञ व सहस्र प्राकृत सप्तशती पाठ सोहळ्यास मंगळवारी (ता.४) देवीस महाअभिषेक करून मंत्रोच्चाराच्या गजरात सुरवात झाली.
जगदंबा देवी सेवा संस्था आणि श्री जगदंबा देवी विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून दर सात वर्षानंतर होणाऱ्या शतचंडी महोत्सवाची यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिराच्या कलशास सुवर्ण मुलामा देऊन कलशारोहण करण्यात आले असून, शिखराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.११) होत असलेल्या पूर्णाहुती सोहळ्यानंतर राशीनसह शेजारील बारा वाड्या आणि राज्यातून उपस्थित राहणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा आस्वाद घेता यावा यासाठी भक्तनिवासाच्या प्रांगणात भव्य अन्नपूर्णा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.
दरम्यान शतचंडीच्या पार्श्वभूमीवर सप्ताहभर देवीची रोज महापूजा, सप्तशती पाठ, देवी भागवत कथा, सामुदायिक आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कडा येथील बबन बहिरवाल यांचे कीर्तन, श्री महालक्ष्मी सांस्कृतिक कला मंच सुर्डी (ता.बार्शी) यांचा साडे तीन पीठे कथा आणि देवी महिमा व्याख्यान, कोल्हापूरच्या श्री, साई समर्थ भजनी मंडळाचा विनोदी भारूड आणि देवी जागर गोंधळ, आळंदीच्या गोविंद गायकवाड यांचे भारूडाचे रंगी, शाहीर देवानंद व पृथ्वीराज माळी यांचा पोवाडा, लोकगीत आणि लोकरंजनातून समाजप्रबोधन, सोमनाथ पानसरे यांचा देवी गाणे व जागरण गोंधळ, पंढरपूरचे रामायणाचार्य नामदेव लबडे यांचे नाचू कीर्तनाचे रंगी, अविनाश भारती यांचे हास्य कवी व्याख्यान आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी (ता.१०) देवीच्या दोन किलोच्या सुवर्ण मुखवट्याची प्रदक्षिणा मार्गावरून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शतचंडी महोत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी राशीनसह परिसरातील ग्रामस्थांनी आठवडाभर मांसाहार वर्ज्य केला असून संबंधित दुकाने आणि हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत.
चौकट :
शतचंडी महोत्सवाची जय्यत तयारी
दोन किलोच्या सुवर्ण मुखवट्याची होणार चल प्राणप्रतिष्ठा, भव्य मिरवणुकीचे आयोजन
हजारो भाविकांच्या महाप्रसादासाठी भव्य अन्नपूर्णा मंडपाची उभारणी.
आठवडाभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
लाखो भाविक राहणार उपस्थित.