संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१८सप्टेंबर २०२४
शिरूर कासार (वार्ताहर) : एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा दहिवंडी ता.शिरूर कासार जि.बीड येथे ७ वे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन डिसेंबर महिन्यात संपन्न होणार असून त्याच्या पुर्वतयारीनिमित्त दहिवंडीचे सरपंच कालिदास आघाव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचे फाउंडेशन चे सचिव पत्रकार गोकुळ पवार यांनी सांगितले. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या तथा एकता फाउंडेशन च्या सल्लागार ॲड.भाग्यश्री ढाकणे-चेमटे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती एकताचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माही शेख आणि सहसचिव लखुळ मुळे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
एकताचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, दहिवंडी ग्रा.पं.सदस्य गणेश सांगळे, जगदीश चेमटे, एकताचे प्रवक्ते मल्हारी खेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एकता च्या वतीने आजपर्यंत पहिले राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन, शिरूर कासार; दुसरे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन, वारणी; तिसरे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन, मानूर; चौथे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन, पिंपळनेर; पाचवे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन, शांतीवन (आर्वी) आणि सहावे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन, गोमळवाडा याठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे संपन्न झालेली असून यंदाचे हे ७ वे राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन दहिवंडीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांना सोबत घेऊन यशस्वी करणार असल्याचे नुकतेच स्वागताध्यक्षपदी निवड झालेल्या ॲड.भाग्यश्री ढाकणे-चेमटे यांनी सांगितले आहे. स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड.ढाकणे यांचा याप्रसंगी एकता कोअर कमिटी आणि दहिवंडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.