संघर्षनामा न्युज l श्रीगोंदा
दि.१७ऑगस्ट २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)-१५ ऑगस्ट रोजी बेलवंडी तालुका श्रीगोंदा येथे खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन येथील माजी सरपंच उत्तम डाके यांनी केल्याचे समजले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी मन लावून प्रचाराचे काम केले होते. परंतु बेलवंडी येथे लावण्यात आलेल्या बॅनर मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील महाविकास आघाडीतील ठराविक नेत्यांना स्थान देऊन इतर नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत होते. तशी चर्चा देखील ग्रामस्थांमधून चर्चिली जात होती तसेच त्या दुर्लक्षित नेत्यांचे कार्यक्रमांमध्ये अनुपस्थिती ही स्पष्टपणे जाणवत होती. त्यांना कार्यक्रमांचे निमंत्रण दिले होते का? हे मात्र समजू शकले नाही.त्यामुळे जनसामान्यांमध्ये आघाडीत बिघाडी झाली की काय? अशी चर्चाही दबक्या आवाजात चालू होती. त्यामध्ये विधानसभेचे बिगुल काही महिन्यांवर येऊन वाजणार आहे; तर बेलवंडी जिल्हा परिषद गट हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. बेलवंडी गावामध्ये खासदारांच्या सत्कार दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या काही बड्या नेत्यांचे कार्यक्रम दरम्यान फोटो वगळण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे पडघम निश्चितपणे जाणवणार आहेत. तशी जोरदार चर्चा देखील बेलवंडी जिल्हा परिषद गटामध्ये सुरू आहे. खासदार निलेश लंके यांनी भाषणामध्ये नगर जिल्ह्याचे सामान्य जनतेने मतदान केलेले आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध आहे अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील हिरवे यांनी केले तर श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप, संजय डाके,विजय काळाने, आदींची भाषणे झाली.