संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे
दि.४ ऑगस्ट २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा व सौ अनुराधा राजेंद्र नागवडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रविवारी दि. 11 ऑगस्ट रोजी युवती व महिलांसाठी भव्य असे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की; बेंगलोर येथील ग्लोबल इलेक्ट्रॉनिक पार्ट लिमिटेड या कंपनीला रोजगार मेळाव्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन रोजगार मेळाव्यासाठी मान्यता दर्शवली आहे. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; या कंपनीमध्ये मुलाखतीनंतर जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना कंपनीकडून सर्व सुख सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रति दरमहा पंधरा हजार दोनशे रुपये व पुढे जास्तीत जास्त तीस ते चाळीस हजार रुपये या कंपनीत रोजगार उपलब्ध होणार आहे. सदर रोजगार मेळाव्या प्रसंगी कंपनीचे अधिकारी महाविद्यालयात मुलाखती घेण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून योग्य मुलाखतीद्वारे मुलींना कंपनीमध्ये जॉईन करून घेणार आहेत. याबाबत मुलाखतीसाठी आपल्या योग्य शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखतीला युवती व महिलांनी उपस्थित राहावे. अधिक माहिती देताना श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या महाविद्यालयाची मोठ्या जिद्दीने व संघर्षातून उभारणी करून आज हे महाविद्यालय सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या महाविद्यालयाला देश व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्री नागवडे यांनी पुढे आणखी म्हणाले की; या महाविद्यालयाने महाविद्यालयीन युवा युवतींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना शिक्षणानंतरही विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने आतापर्यंत करियर कट्टाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधून नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही युवतींसाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या रोजगार मेळव्यासाठी जास्तीत जास्त युवती व महिलांनी रोजगार मेळाव्याचे सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश चंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते.