संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१९ जुलै२०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील पुरातन कालीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून या देवताची पालखीतून ग्रामस्थांनी मिरवणूक काढत गावातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनाचा लाभ अबाल वृद्धांना मिळाला. दरम्यान लिंपणगाव येथे सालाबाद प्रमाणे जवळपास 70 ते 75 वर्षापासून दिवंगत ह भ प बापू अण्णा कुरुमकर यांच्या अथक प्रयत्नातून पारंपारिक पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची गावातून पालखी द्वारे वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आजही ग्रामस्थ व भजनी मंडळाने कायम ठेवली आहे. चालू वर्षी देखील आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल नामाच्या गजरामध्ये वाजत गाजत भजनी मंडळाच्या अभंगवणीतून भक्तिमय वातावरणात गावातील ग्रामस्थांनी भव्य असे पालखी सोहळ्याचे आयोजन केले.
प्रामुख्याने या पालखी सोहळ्यामध्ये गावातील अबाल वृद्धांनी मोठा सहभाग नोंदवला. या पालखी सोहळ्यामुळे लिंपणगावमध्ये प्रति पंढरपूरचे स्वरूप दिसून आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कांबळे कुटुंब ह भ प बापू अण्णा कुरुमकर यांचे पुत्र सुदामराव कुरुमकर; ग्रामपंचायत माजी सदस्य जालिंदर कुरुमकर; बबनराव भगत; बबन बडवे; बाळासाहेब रेवगे अमोल खळदकर; दत्तात्रेय कांगळे; चंद्रकांत भोईटे; केशव भोईटे; सतीश काशिनाथ भगत; सीताराम वाल्हेकर आदींनी हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या पालखी सोहळ्यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. महारतीनंतर पालखी सोहळ्याचे पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसर्जन करण्यात आले.