लोणी व्यंकनाथ येथे बिबट्याची दहशत थांबता थांबेना

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि २० डिसेंबर २०२५

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यांत बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बिबटे दिवसाढवळ्या शेतकरी, शेतमजूर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात बिबट्यांच्या दहशतीमुळे शेती उद्योग धोक्यात आला असून, मजूर देखील रोजंदारीच्या कामावर येण्याचे धाडस करत नाहीत. दरम्यान मागील महिन्यात लोणी व्यंकनाथ येथे काकडे कुटुंबियांच्या गाईवर हल्ला केला त्यात दुभती गाई ठार झाली, आता पुन्हा लोणी व्यंकनाथ येथील चिंभळा रोडवर दादा भाऊसाहेब काकडे यांची शेळी बिबट्याने ठार केली. सद्यस्थितीला शेती उद्योग जोमात असताना बिबटे मात्र दिवसाढवळ्या फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी श्रीगोंदा तालुक्यात कमी असल्याने वन कर्मचाऱ्यांची देखील मोठी धांदल उडताना दिसत आहेत. दररोज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याची खबर मिळत असताना वनविभागाचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल होत आहेत. श्रीगोंद्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली भगत मॅडम ह्या बिबट्याची खबर मिळताच तातडीने कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. शेतकऱ्यांना धीर देत आहेत. बिबट्या पासून बचाव करण्यासाठी उपाय योजना सांगत आहेत. परंतु बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस मोठी होत असल्याने वन कर्मचारी देखील मेटाकोटीला आल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी देखील वन कर्मचारी नेमण्यासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगतात. 

 शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी तालुक्यात गहू, कांदा इत्यादींच्या पेरणी व लागवडीमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत बिबट्यांचे वारंवार शेतकऱ्यांना दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाल्याचे बोलले जात आहे. लिंपणगावमध्ये देखील दिवसा 19 डिसेंबर रोजी बिबट्यांनी दर्शन दिले. त्यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी देखील भीतीच्या वातावरणाखाली वावरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू आहेत. बिबट्यांना ऊस तोडीमुळे दडण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे अनेक बिबट्यांची पिल्ले ऊसाच्या फळांमध्ये ऊसतोड मजुरांना दिसून येत आहेत. या बिबट्यांच्या भीतीमुळे ऊस तोडणीवर देखील काही गावांमध्ये विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बिबटे दुधाचे पाळीव जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे कधीकधी शेतकऱ्यांवर देखील हल्ले करत आहेत. चोरट्यांपेक्षा शेतकऱ्यांना आता बिबट्यांची भीती मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने शेतकरी शेतीची कामे जीव मुठीत धरूनच करताना दिसत आहेत. लोणी व्यंकनाथ मध्ये शेळी ठार केल्यानंतर खबर मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी दिपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी संभाजी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शेळीचा पंचनामा केला. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Related Post