संघर्षनामा वृत्तसेवा l नगर
दि . १९जाने.२०२५
(प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासह सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या शहरातील आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्काराने गौरविण्यात आले. सावित्री ज्योती महोत्सवात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते कैदके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पाईपलाइन रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले, डॉ. रमेश वाघमारे, प्रा. हर्षल आगळे, सुहासराव सोनवणे, रजनी ताठे, ॲड. शारदाताई लगड, सिनेकलाकार मोहिनीराज गटणे, संयोजिका जयश्री शिंदे, मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, रामदास फुले आदी उपस्थित होते.
कावेरी कैदके यांनी अतिशय कमी वयामध्ये दुबई, थायलंड, पुणे आदी ठिकाणाहून ब्युटी क्षेत्रातील अद्यावत ज्ञान आत्मसात केलेले आहे. सौंदर्यशास्त्र मध्ये पारंगत होऊन अनेक मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना सातत्याने पार्लरचे प्रशिक्षण त्या देत आहेत. अहिल्या फाउंडेशनच्या त्या संस्थापिका अध्यक्षा असून, संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, ग्रामीण भागातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार, ब्युटी टॅलेंट शो, ब्युटी क्षेत्रातील तज्ञांचे सेमिनार, वस्तीगृहातील मुलींना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण, तसेच स्वच्छता अभियान, मतदार जागृती, वृक्षारोपण व संवर्धन आदी विविध सामाजिक कार्य त्या करत आहेत. महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्री ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना कैदके यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी अहिल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरु राहणार आहे. या पुरस्काराने आनखी सामाजिक कार्यासाठी बळ व प्रोत्साहन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.