संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
शिर्डी - छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. त्याच विचारांवर राज्यशासन लोककल्याणासाठी काम करत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती उत्सवानिमित्त पालकमंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. प्रवरानगर येथे व्यापारी मित्र मंडळ, लोणी खुर्द व बुद्रुक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमांना उपस्थित राहून महाआरतीत सहभागी झाले. लोणी खुर्द येथे पालकमंत्र्यांनी शस्त्रपूजन केले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनी विखे पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य अखंड हिंदुस्थानचे बलस्थान आहे. त्याग आणि संघर्षातून मिळालेले स्वराज्य टिकवून ठेवणे, आपले सर्वांचे कर्तव्य आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संस्कृतीचा अनमोल ठेवा असल्याने तो जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. महाराजांनी जिंकलेल्या गड-किल्ल्यांचा अभ्यास व व्यवस्थापन कौशल्य समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.