संघर्षनामा वृत्तसेवा।श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
मराठी नाटकाचा आणि रंगभूमीचा आरंभ विष्णुदास भावे यांच्या नाट्यकाऱ्याने झाला असे आपण मानतो परंतु त्याही आधी नाटक-रंगभूमिनिर्मितीचे जे प्रयत्न झाले आहेत, तेही तितकेच महत्वाचे आहेत. त्यांतील एक म्हणजे लोकरंगभूमीचा आणि दुसरा प्रयत्न तंजावरच्या राजांनी लिहिलेल्या नाटकांचा.
विष्णुदास भावे यांच्या अगोदर म्हणजे १८४३ पूर्वी, मराठी रंगभूमी संघटित स्वरूपात मूर्त झालेली नव्हती परंतु कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, सोंगीभजन, खेळे, दशावतार, लळित, तमाशा, गोंधळ, बोहाडा, वासुदेव, कीर्तन आदी जे अनेक कलाप्रकार जनमानसात रूढ होते, त्यांत तिची बीजे दिसून येतात. हे कलाप्रकार म्हणजे लोकरंगभूमीचीच रूपे म्हणावी लागतील. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, आदींच्या वाङ्मयातून या लोकरंगभूमीचे उल्लेख आढळतात प्रत्यक्ष रंगभूमीचे अथवा तिच्यासाठी आवर्जून लिहिलेल्या नाटयसंहितांचे रूप, प्रत्यक्ष पुरावे मात्र आढळत नाहीत.
विष्णुदास अमृत भावे यांनी १८४३ साली सीतास्वयंवर नाटकाच प्रयोग करून एक नाट्यपरंपरा आरंभित केली. १८४२ साली कर्नाटकातून सांगलीस आलेल्या भागवत नावाच्या नाटक मंडळीने केलेले खेळ पाहिल्यानंतर विष्णुदासांनी त्यातला आवश्यक तो भाग घेऊन आणि काही वेगळेपण ठेवून आपल्या सीतास्वयंवर ह्या नाट्याख्यानाचा प्रयोग केला व पुढे आणखीही नाट्याख्याने लिहिली.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी वाङ्मयाचा परिचय मराठी समाजातल्या सुविद्य मंडळीना होऊ लागला. इंग्रजी आणि संस्कृत नाटकांची भाषांतरे करणे ह्या गोष्टीचे आकर्षण त्यांतील काहींना वाटू लागले. १८५१ साली पहिले भाषांतरित नाटक मराठीत प्रसिद्ध झाले. या कालखंडात ही जी भाषांतरित नाटके होती, त्यांना पुढे बुकिश नाटके अशी संज्ञा प्राप्त होण्याचे कारण म्हणजे ह्या भाषांतरित नाटकांना योग्य प्रमाणात प्रयोगरूप लाभत नव्हते. बहुधा ती नाटके ग्रंथरूपाने बंदिस्त होऊन राहात. त्यांतल्या काहींनाच प्रयोगाचा योग आला.
विष्णुदास भावे यांच्या नाटकांची अपूर्वाई १८६५ नंतर ओसरू लागली. याच काळात पौराणिक-ऐतिहासिक नाटकांच्या बरोबरीने फार्स या प्रकाराचा प्रयोग होत असे. फार्स म्हणजे केवळ विनोदी स्वरूपाचे, प्रहसनवजा असलेले नाट्य अशी जी पुढे समजूत झाली, ती या फार्सांच्या जन्माच्या वेळची नव्हती. काही ऐतिहासिक स्वरूपाच्या गंभीर अथवा शोकान्त नाटकांनासुद्धा फार्स म्हणण्याची पद्धत होती. उदा., नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स, अफझुलखानाच्या मृत्युचा फार्स.
मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर हे होत. संगीत शांकुतल (१८८०) आणि संगीत सौभद्र (१८८२) ह्या नाटकांमुळे त्यांचे नाव मराठी नाटककारांत अग्रेसर राहिले आहे. निर्भेळ आणि सात्त्विक रसनिर्मिती हे किर्लोस्करांच्या नाट्यनिर्मितीमागचे सूत्र होते. किर्लोस्करांनी केवळ नाट्यलेखनच केले नाही, तर आपण लिहिलेली नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली.
गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी, न.चि.केळकर, भार्गवराम वरेरकर, चिंतामणराव कोल्हटकर, अनंत काणेकर, आचार्य प्र.के. अत्रे, वि.वा शिरवाडकर, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे, वसंत शंकर कानेटकर, विजय तेंडुलकर, विद्याधर गोखले, विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, पुरुषोत्तम बेर्डे, वसंत सबनीस, विश्राम बेडेकर, दादा कोंडके, रणजीत देसाई, गो.नी.दांडेकर, श्री.ना.पेंडसे, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, रणजीत देसाई, पु.शि. रेगे, चिं.त्र्यं. खानोलकर, लक्ष्मण देशपांडे असे अनेकांचे नाट्यसृष्टीला मोलाचे योगदान आहे.
१९६० ते १९८० या दोन दशकांच्या कालखंडात नाटक आणि रंगभूमीच्या संदर्भात बरीच घडामोड झालेली आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही स्तरांवरचा आलेख सर्वलक्षी बनला. भिन्न भिन्न नाटककारांच्या नवनवीन नाट्यकृतींनी अनेक प्रश्न निर्माण केले. जसा नाटककारांचा नवा वर्ग निर्माण झाला, तसाच प्रयोगकर्त्यांचाही झाला. नवनवीन नाट्यसंस्था कार्यमग्न झाल्या. नवा जाणता प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. रंगभूमीचे वातावरण चैतन्यदायी बनले.
यानंतरच्या काळात अनेक ऐतिहासिक, पौराणिक, संगीत नाटके रंगभूमीवर आली. यात नवनवीन प्रयोगदेखील झाले. त्यातून मराठी रंगभूमी अधिक विकसित झाली. पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या तीन पैशांचा तमाशाच्या निमित्ताने पाश्चात्य संगीताचा वापर झाला. विजय तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचे अल्वारा डाकू ह्या दोन नाटकांतील लोकसंगीताच्या वापराने नाटकांतील संगीतसंकल्पनेला एक वेगळे परिमाण लाभले. मराठी नाटककाराला आणि प्रेक्षकालाही विनोदाची ओढ बरीच आहे. या ओढीनुसार मराठी नाटकांत विनोदाचा वापर सतत होत आलेला आहे.
परकीय नाट्यकृतींची भाषांतरे-रूपांतरे ही आपल्याकडे आरंभापासून होत आलेली आहेत. याचबरोबर आणखी एक महत्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे काही भारतीय भाषांतील नाटके मराठीत आली आणि मराठीतीस काही नाटके अन्य भारतीय भाषांत गेली. ज्यांच्या नाट्यकृती अन्य भारतीय भाषांत अनुवादित वा रूपांतरित केल्या गेल्या अशा मराठी नाटककारांत पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर आदींचा समावेश होतो. अन्य भारतीय भाषांतील, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, आद्य रंगाचार्य, शंभू मित्रा, बादल सरकार, उत्पल दत्त, जगदीशचंद्र माथुर आदींच्या नाट्यकृतींचा परिचय मराठीला झाला. केवळ या नाट्यकृतींचाच मराठी रंगभूमीस परिचय झाला, असे नव्हे तर त्या निमित्ताने भिन्न भाषीय, प्रांतीय रंगभूमीचे लोक अधिक जवळ आले.
निरनिराळ्या कारणांनी यशदायी झालेल्या कादंबऱ्यानना नाट्यरूप देण्याची प्रथा गेल्या काही वर्षात आरंभित झाली. कवी-नाटककारारंची कविप्रतिभा नाट्यनिर्मितीला पूरक ठरली. स्त्री-नाटककार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. तारा वनारसे ह्यांचे कक्षा सरिता पदकी ह्यांची बाधा, खून पहावा करून, एक प्रेम झेलू बाई, मालतीबाई बेडेकरांचे हिरा जो मंगला नाही, ज्योत्स्ना देवधर यांचे कल्याणी, ज्योत्स्ना भोळे यांचे आराधना अशा अगदी तुरळक नाट्यकृती दिसतात. वास्तविक कथा, कादंबरी, कविता ह्या साहित्य प्रकारांत अनेक लेखिकांनी-कवयित्रिंनी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. परंतु नाट्यलेखनाच्या क्षेत्रात मात्र हे कर्तृत्व फारच मर्यादीत आहे. ग्रामीण, सामाजिक, राजकीय विषयांवरचे नाट्य लेखन मर्यादीतच आहे. अलिकडच्या काळात असे विषय हाताळणारे लेखक पुढे येतांना दिसतात.
ज्या वेळी परंपरेने आलेल्या गोष्टी पुन्हा तपासून पाहण्याची वेळ किंवा अपरिहार्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हाच प्रायोगिकता घडत असते. विषयआशय–आविष्कार यांच्या स्तरांवर हे घडत असते. अशा प्रायोगिक नाटककारांमध्ये सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, वृंदावन दंडवते, अच्युत वझे, गोविंद देशपांडे, दिलीप जगताप अशी काही नावे सांगता येतील. प्रायोगिक नाटके होत असतांना मराठी रंगभूमीत अनेक चर्चा-वादळे झडली, तरीही या नाटककारांनी आपले प्रयोगव्रत ढळू दिले नाही.
प्रायोगिक लेखकांनी एकांकिकालेखनातही फार मौलिक भर टाकली आहे. अनंत काणेकर, मो.ग. रांगणेकर ह्यांच्यापासून मराठी एकांकिकांचे लेखन जाणतेपणाने सुरू झाले आणि त्या प्रकाराला प्रतिष्ठा मिळाली विजय तेंडुलकरांच्या लेखनामुळे. त्यांनी एकांकिकांचा चेहराच बदलून टाकला. एकांकिका लेखनाला, प्रयोगांना जी प्रतिष्ठा लाभली, त्या प्रतिष्ठेला अनेक नाट्यसंस्था कारणीभूत झाल्या. एकांकिकांप्रमाणेच बालनाट्ये, कामगारांसाठी नाटके लिहिली जात आहेत. एकपात्री किंवा बहुरूपी स्वरूपाचे खेळ सुरू झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने आणि अन्य खाजगी संस्थांच्यावतीने लहानमोठ्या अनेक स्पर्धा घेतल्या जातात, त्यामुळे नवे विषय, नवे आशय रसिकांसमोर मांडले जातात. ह्या स्पर्धांमुळे नाटकाचे वातावरण सर्वत्र निर्माण झाले. नाट्यशिक्षणाचे महत्वही वाढत आहे. या क्षेत्रात अनेक नवे आणि स्वागतार्ह प्रयोग होता आहेत. या प्रयत्नांमुळे मराठी नाट्यसृष्टी अधिकाधिक समृद्ध होत आहे.
संकलन-जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर
(संदर्भ-मराठी विश्वकोश)