संघर्षनामा वृत्तसेवा। श्रीगोंदा
दि.9 फेब्रुवारी 2025
प्रतिनिधी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड, पुणे येथे एनएलसी भारत - कॅपॅसिटी एनहान्समेंट प्रोग्राम फॉर लेजिस्लेटर्स ऑफ भारत २०२५ कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
एनएलसी भारत - कॅपॅसिटी एनहान्समेंट प्रोग्राम फॉर लेजिस्लेटर्स ऑफ भारत २०२५ चे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगातील सगळी माहिती व क्षमता आपल्याकडे असल्याच्या विचारातून बाहेर पडू तेव्हा आपण चांगले आमदार किंवा राजकीय नेता होऊ शकतो.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लोक आपल्या आकांक्षांसाठी आपल्याला निवडून देतात, पण अनेकदा पाच वर्षे निघून जातात आणि या आकांक्षांची दखल घेतली नाही, असे लक्षात येते. म्हणून आपण ज्यासाठी निवडून आलो त्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मतदारसंघात फिरताना कोणत्या अस्त्राचा वापर करुन जनतेच्या मागण्या पूर्ण करु शकू आणि विधानसभेत असू तेव्हा माझ्या मतदारसंघाशी संबंधित विषयाकडे कसे लक्ष वेधून घेऊ, या माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या मंत्राची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.
आमदारांनी विधिमंडळात कायद्यावर बोलले पाहिजे, अर्थसंकल्पावर चर्चा केली पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्यावर टीका होते पण, जनता टीका लक्षात ठेवत नाही, तर केलेले काम लक्षात ठेवते. आपण जनतेचे काम व विधिमंडळाचे काम यात संतुलन ठेवले पाहिजे, असे सांगितले.
एखादी नवी गोष्ट शिकायची संधी मिळते तेव्हा मी तत्काळ त्यासाठी पुढाकार घेतो. कारण तंत्रज्ञान बदलत असून यापासून आपण दूर राहू शकत नाही. अमेरिकेत २०१६ साली तंत्रज्ञानाचा वापर करुन डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. आपल्यापुढे तंत्रज्ञानाने आव्हाने, प्रश्न उभे केले आहे, तशी संधीही दिली आहे. यावर या संमेलनात मंथन व्हायला हवे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे राहुल कराड व इतर मान्यवर उपस्थित होते.