संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.६ फेब्रू.२०२५
स्वातंत्र्यपुर्व काळात १९४५ साली जन्मलेले अन् स्वातंत्र्य काळात परीस्थितीचे चटके सहन करत मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेत डीएड पुर्ण करत दिगांबर संभाजी वाळके गुरुजी यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली आणि तिही अतिशय आवडीने.थिटेसांगवी गावातील ते तसे पहिलेच प्राथमिक शिक्षक.मळलेल्या वाटेने अनेक जण चालत असतात. पण शिक्षण क्षेत्रात आपण नवीन काहीतरी करूनदाखवावे. देशप्रेम आणि समाजप्रबोधन हे महत्त्वाचेअंग मानून दिगांबर गुरुजी यांनीजुन्या काळात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी अनेक कृती उपक्रम राबवून शिक्षणक्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला.सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गावाच्या सामाजिक कार्यात स्वत:ला झोकुन देणारे व थिटेसांगवीचे प्रथम सरपंच होण्याचा मान मिळणारे बापूदादा वाळके हे दिगांबर गुरुजींचे आजोबा,त्यांच्या सैन्यदलातील शिस्तीचा प्रभाव गुरुजींच्या आयुष्यावर पडला,वडील संभाजी वाळके हे धार्मिक वृत्तीचे वारकरी संप्रदाय व संतपरंपरेला मानणारे त्यातूनच गुरुजींच्या जीवनावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा पगडा पडला आणि आळंदीची वारी त्यांच्या घरात चालु झाली.
डीएड पुर्ण झाल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी १९६६ साली थिटेसांगवी ता-श्रीगोंदा येथे त्यांनी आपल्या गावातच प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली.तीन बटणाचा नेहरु शर्ट,पायजमा, गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेल्या गुरुजींची मूर्ती सात्विक वाटे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव होता. तो त्यांच्या वर्तनातून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून स्पष्टपणे दिसत असे.गुरुजी पुस्तकाविना सहसा दिसत नसत. अगदी प्रवासातदेखील त्यांच्याजवळ पुस्तकं किंवा वर्तमानपत्र असत. ते फावल्या वेळात पुस्तक वाचून, आपली ज्ञानाची तहान भागवीत असत. असा ज्ञानपीपासू व वेळेचे महत्त्व जाणणारा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. गुरुजींनी लवकरच विद्यार्थ्यांची मने जिंकली होती.पुर्न:वसन होण्याआधीच्या थिटेसांगवी गावात प्राथमिक शाळा १ ते ७ वी पर्यंत होती,त्यावेळी ५वी व ७ वीचा वर्ग त्यांच्याकडे असे,पुर्नवसीत थिटेसांगवीत १ ते ४ थी पर्यंतच वर्ग प्राथमिक शाळेत राहीले त्यावेळी इ.१ ली च्या वर्गाची जबाबदारी दिगांबर गुरुजींकडे असे,गणित विषयात त्यांचे प्रभुत्व.वर्गातील सगळ्या मुलांचे पाढे तोंडपाठ असले पाहिजे यावर त्यांचे लक्ष असे,ज्याचे पाढे पाट नाहीत तो मात्र गुरुंजीच्या हातातील छडीचा प्रसाद यथोच्च घेत असे.त्यावेळी गुरुजींनी पाढे म्हणायला लावले की वर्ग एका तालात व सुरात मोठ्या आवाजात पाढे म्हणत असे त्याचा आवाज मारुतीच्या मंदिरापर्यंत येत असे,अध्यापन करत असताना त्यांच्यासाठी सगळे विद्यार्थी समान होते,आपल्या घरातील मुलांना देखील त्यांचा तेवढाच धाक असे.आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण त्यांच्या ठायी होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाचीही गरज पडत नसे. कारण, विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास घरुन करून येत. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसर्या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वांकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तासंतास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. पुढे गुरुजींचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलेले आहे की, गुरुजी आम्हाला शिकवत होते हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो. वर्गात शिकवताना धड्यातील कारुण्य प्रसंगांनी रडलेले गुरुजी त्यांना पाहता आले. गुरुजींनाही आपण शिकवलेल्या करूण रसात साश्रूपूर्ण नेत्रांनी डुंबलेले विद्यार्थी पाहता आले. संवादाने मनामनाच्या तारा जुळवणारे धन्य ते गुरुजी आणि धन्य ते विद्यार्थी.श्रीगोंदे तालुक्यातीलथिटेसांगवी,सुरेगाव,बनपिंप्री,रुईखेल,घोगरगाव येथे त्यांनी सेवा बजावली,घोगरगाव येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कारभार पहात असताना त्यांनी केंद्रप्रमुख म्हणून आपला एक वेगळा ठसा शिक्षणक्षेत्रात निर्माण केला.२००३ साली गुरुजी आपली शिक्षण क्षेत्रातील ३६ वर्षाची सेवा पुर्ण करुन निवृत्त झाले.
दिगांबर गुरुजींनी आपल्या व्यवसायात तन-मन धन अर्पण केले. कर्मज्ञान आणि त्यागाचा वसा घेतला.ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांवर नितांत श्रद्धा ठेवली. यातूनच त्यांचे ओजस्वी, तेजस्वी व्यक्तिमत्वाला बहर आला. गुरुजींनी जीवनात संयम, विवेक, सेवा आणि सहकार्य यांना फार महत्त्व दिले. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त त्यांना प्रिय होती. कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत थिटेसांगवी ग्रामस्थांनी २६ जानेवरी २०२१ साली त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.पुर्न:वसीत थिटेसांगवीच्या जडणघडणीत त्यांनी स्व.पांडाभाऊ उगले यांच्या बरोबर स्वत:ला झोकुन देऊन काम केले.त्यांनी उत्तम शेती केली.गुरुजी हे तसे घरात थोरले,सहा भावंडांचे त्यांचे ३०-३५ जणांचे मोठे कुटुंब,शामराव(आण्णा),रामचंद्र(बापू),लक्ष्मण(आबा),बलभिम(सर),सुभाष(तात्या) हे भावंडे,सगळ्यांवर त्यांचे नितांत प्रेम,सगळ्यांनी एका विचाराने रहावे, पुढील पिढीने चांगले शिक्षण घ्यावे म्हणून त्यांचा कायम प्रयत्न असे, पत्नी झुंबरबाईने त्यांची अखेर पर्यंत सेवा केली,गुरुजींना दादासाहेब व विवेक हे दोन मुले आणि मनिषा व कल्पना दोन विवाहीत मुली, बॅक मॅनेजर पांडुरंग आरडे साहेब व श्रीगोंदे शहरातील शारदा विद्यानिकेतनचे प्राचार्य बंडु मखरे सर हे गुरुजींचे जावई.गुरुजींचा शिक्षण क्षेत्रातील वारसा पुढे बंधु बलभिम वाळके सर यांनी चालवला व तीन वर्षापुर्वी ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले, मुलगा विवेक वाळके सर शिक्षणक्षेत्र व बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे व दादासाहेब वाळके थिटेसांगवी येथे उत्तम शेती करत आहे.
शिक्षक म्हणून काम करताना ज्या गावात ते वास्तवास असत त्या गावी सामाजिक न्याय निवाडा करणे आणि गरीबांना शाब्दिक तसेच आर्थिक मदत देण्याचे काम त्यांनी केले .विद्यार्थीदशेपासून ते आजतागायत त्यांनी माणुसकीची नाती जपली.सामाजिक बांधिलकीतून अनेक सामाजिक, धार्मिक संस्थांना त्यांनी मदत देऊ केली. शिक्षण घेऊन आपले कुटुंब चांगले सांभाळा , व्यसनांपासून अलिप्त रहा ,असा ते तरूणांना आवर्जून सल्ला देत. नोकरी धंदा करणाऱ्या , तसेच सामाजिक, धार्मिक काम करणाऱ्या तरूणांबद्दल ते आदर व्यक्त करत.धाडस आणि करारीपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते.उतार वयात गुरुजींची त्यांच्या कुटुंबियांनी उत्तम सेवा केली. गुरुजींच्या निधनाबद्दल अनेक जाणकारांनी शोक व्यक्त केला.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले-विवाहीत मुली, सूना,जावई,नातवंडे, बहिण,बंधु, पुतणे असा मोठा परिवार आहे. दिगांबर संभाजी वाळके गुरुजी यांनी बुधवार दि.२९ जानेवारी २०२५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी रहात्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्याअनेकसंघटना,सामाजिक,राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर उपस्थित होते.शिक्षण क्षेत्रातील एक जाणकारव्यक्तिमत्त्व हरपले असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
दिवंगत दिगांबर संभाजी वाळके गुरुजी आज देहरुपाने आपल्यात नसले ,तरी त्यांचे कार्य आपणां सर्वांना कायम प्रेरणा देत
राहील..!!
शब्दांकन.. प्रा. कानिफनाथ पांडुरंग उगले सर.