संघर्षनामा वृत्तसेवा। अहिल्यानगर
दि.27 जाने. 2025
प्रतिनिधी
अहिल्यानगर दि.27 भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ॲग्रीस्टॅक सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ॲग्रीस्टॅक कार्डसाठी नोंदणी सुरू केली आहे. अॅग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. एकत्रित डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. तसेच जे लाभार्थी आणि गरजू शेतकरी आहेत, त्यांना वेळेवर मदत मिळण्यासाठी याचा उपयोग होईल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यासाठी शेतकरी संख्या आणि पिकांची आकडेवारी शासनाला तातडीने उपलब्ध होईल. शेतकरी आणि कृषी योजनांची आखणी करणे, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.