संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१९जाने.२०२५
प्रतिनिधी,
शिरूर कासार - (राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्य नगरी, दहिवंडी) वाचन संस्कृतीला दृष्य माध्यमांनी ग्रासलं असून त्यामुळे समाजात स्वार्थीपणा आणि संकुचितपणा वाढत चालला आहे. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्य करत असून शहरी भागासह ग्रामीण भागात साहित्य संमेलनाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सातव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी केले. त्या तालुक्यातील दहिवंडी येथील राष्ट्रसंत भगवान बाबा साहित्य नगरीत आयोजित केलेल्या सातव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा पदावरून बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर उद्घाटक माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस यांचे प्रतिनिधी म्हणून युवा नेते जयदत्त धस यांच्यासह पद्मश्री शब्बीर सय्यद, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भास्कर बडे, स्वागताध्यक्षा ॲड.भाग्यश्री ढाकणे, साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.राजेश गायकवाड, माजी सदस्य विलास सिंदगीकर, सरपंच कालिदास आघाव, उपसरपंच रवि आघाव, माजी सरपंच शिला आघाव, लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप जायभाये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी प्रविण हासे, डॉ.आर.एस. बडजाते, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य बाबुराव जायभाये यांची उपस्थिती होती. या वेळी बोलताना दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या की मातृभाषेत बोलणे गैर नाही. मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतूनच बोलावे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. समाजात सध्या मोठ्या प्रमाणावर जातीय, प्रादेशिक, भाषिक वाद वाढत आहे. त्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. मनाची उदारता कृतीतून दिसली पाहिजे. संत साहित्यात उत्तम माणूस घडविण्याची ताकद आहे. व्यक्तीवर सुसंस्कार हे वाचनामुळे होतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे घरात संवाद राहिला नाही. माणुसकी हरवल्याचे चित्र सध्या दिसत असुन हे निश्चितच निराशाजनक असल्याचे देखील क्षीरसागर म्हणाल्या. या वेळी कार्यक्रमाला एकता फाउंडेशनचे अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना फुंदे, लता कराड, रंजना डोळे, दिपक महाले, नितीन कैतके, राजेश बीडकर, रमेश बडे, सुग्रीव केदार, संदीप शिरसाट, बळीराम तोगे, दिपाली नाईक, अनिता आंधळे, लक्ष्मण चांदणे, नबिलाल सय्यद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट - ग्रंथदिंडीने वेधले लक्ष साहित्य संमेलनाची सुरुवात सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिरापासून ग्रंथदिंडीने झाली. या वेळी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. सदरील ग्रंथदिंडीचे संमेलन संमेलनाध्यक्ष स्थळापर्यंत येताना गावातील महिलांनी आपल्या दारासमोर रांगोळी काढून स्वागत केले.