संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२९ सप्टेंबर २०२४
शिरूर कासार (वार्ताहर) : वाचन चळवळीत काम करतांना एक बाब प्रकर्षानं लक्षात येते ती म्हणजे, हल्ली वाचकांची संख्या कमी होत असली तरीही लिहिणाऱ्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागात हे प्रमाण मोठे आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना प्रकाशात आणण्यासाठी साहित्यिक अनंत कराड यांच्या नेतृत्वाखालील एकता फाउंडेशन संस्थेने साहित्य संमेलने, कवी संमेलने, पुरस्कार वितरण आदी उपक्रमांचा धडाका उठवला आहे. त्यामुळे अनेक नव्या जुन्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळालेले असल्याने संस्थेचे सर्व पदाधिकारी कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन शेवगाव जि.आहिल्यानगर येथील अनुराधा प्रकाशनचे मालक तथा लेखक मिलिंद काटे यांनी केले. एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 26 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या उद्घाटक पदावरून ते बोलत होते.
एकताचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, राज्य प्रवक्ता मल्हारी खेडकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नांदेड येथील कवी विरभद्र मिरेवाड यांनी
स्वर्गातले पुण्य सरले
पाहिला नाही आम्ही पाताळ
कुठे आहेस भगवंता
इथे सतावतो वेताळ
या भूते नावाच्या रचनेबरोबरच
तुझ्या मुखातून तूच कर
पुन्हा एकदा आकाशवाणी
हरिश्चंद्र वाहतो येथे
डोंम्याघरी अजून पाणी
ही गावगाडा नावाची कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर बीड येथील आदर्श शिक्षक भागिनाथ बांगर यांनी
माय मही अडाणी
ओव्या गाई जात्यावरी
जात फिरे गुरु गुरु
पीठ गोलाकार पडे भूरू भूरू
ही माझी माय या कवितेसह
शासनाचे पॅकेज जाहीर झालं
वाटण्या अगोदरच का संपून गेलं
ही कर्जमुक्ती नावाची शेतकऱ्यांविषयीच्या योजनांवर परखड भाष्य करणारी रचना सादर केली. तद्नंतर माजलगाव येथील जेष्ठ कवयित्री प्रतिभा थिगळे यांच्या
ह्रदयातील भावना शब्द रुपाने
कागदावर जेव्हा उतरते
तेव्हा सखे तिथे
मला कविता दिसते
कविता काय असते या आणि बाईच बाईपण
खर तर बाईचं बाईपण
तिला ही कधी जड होतं
पण बाई शिवाय घराला
घरपण ही कुठ येतं
या स्री-वादी कविता पेश करत श्रोत्यांना खिळवून ठेवले. मुळचे परळी वैजनाथ परंतु सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणारे कवी केशव कुकडे उर्फ मुक्तविहारी यांनी
अन्याय अंती जावे
कवितेने नव्या युगाच्या
गरिबीस सुख यावे
हाकेने नव्या मनाच्या
ही कविता नव्या मनाची रचना आणि
ज्यानं घ्यावं त्यानं द्यावं
नको संकुचित मन
मीच धर्म
मीच दान !
मीच माती मीच ढग या ह्रदयस्पर्शी कविता उपस्थितांना ऐकवल्या. यवतमाळ जिल्ह्यातील जेष्ठ कवयित्री रश्मी धर्माधिकारी यांनी
क्षणाक्षणाला साथ देई
जीवन साथी कविता राणी
स्वर रत्नांचा साज चढविता
तिचीच झाली मंजूळ गाणी
ही कविताराणी शिर्षकाची मार्मिक रचना सादर केली. त्यानंतर शिरूर कासार तालुक्यातील कार्तिक कांबळे या विद्यार्थ्याने
माझ्या मते लढत रहा
कष्टाशिवाय पर्याय न्हाई,
खचून जाऊ नको गड्या,
निघेल मार्ग यातून काही.
माझ्या मते नावाच्या उपरोक्त कवितेसह
रात्रीचा दिवस करतो आहे ,
स्वप्न यशाचं बघतो आहे .
मुलगा आहे ना ...!
कुटुंबासाठी लढतो आहे.
ही मी मुलगा आहे नावाची तरूणांच्या व्यथा सांगणारी उत्तम रचना रसिकांसमोर सादर करून वाहवा मिळवली. उपस्थित मान्यवरांच्या आग्रहास्तव साहित्यिक अनंत कराड यांनी
तो जोडतो
दोन मनं, दोन रेषा
दोन भिंती, दोन दिशा
तो घेतो सामावून
दु:ख, दैन्य, निराशा.
ही कोपरा नावाची रचना पेश करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाचे उद्घाटक मिलिंद काटे यांनी
शहीद भगतसिंगांच्या स्मृतीला स्मरून...!
मी करतो आवाहन...
एकतेच्या विचार मंचावरून..!
हे सारस्वतांनो करू नका आता उशीर..!
ऐकावयास तुम्हाला आम्ही
रसिकजन झालो अधीर...!
ही रचना सादर केली तर काव्य संमेलनाचे सूत्रसंचालक परशुराम सोंडगे यांनी बहारदार सूत्रसंचालन करत
गिधांडाचा थवा
बघा साव झाला
लबाडानाच बघा
कसा भाव आला.
बगळे आणि गाव ही रचना ऐकवून धमाल उडवून दिली. शेवटी संमेलनाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य मा.धनंजय गुडसूरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांच्या मुली करतात नेहमी.. या कवितेने श्रोत्यांना अंतर्मुख केले.
या काव्य संमेलनाचे प्रस्ताविक एकता फाउंडेशन शेवगाव चे अरूण तमानके यांनी तर आभार प्रदर्शन कोअर कमिटीचे पदाधिकारी फौजी कैलास खेडकर यांनी केले. यावेळेस एकताचे युवक प्रदेश सरचिटणीस बलराम मनिठे, परभणी जिल्हा उपाध्यक्षा मेघा नांदखेडकर, परभणी महानगरीय अध्यक्षा शोभा घुंगरे, एकताचे बीड युवक जिल्हाध्यक्ष अमोल राठोड, वि.भा.साळुंके (आष्टी), कवयित्री गौरी देशमुख (माजलगाव), डाॅ.भाऊसाहेब नेटके (पैठण), शिरूर तालुका विद्यार्थी आघाडी प्रतिनिधी कार्तिक कांबळे, डाॅ.स्नेहल सानप, लता बडे, दिपक पाठक, भगवान कंठाळे आदी मान्यवर उपस्थित होते.