पत्रकारितेचा वसा घेऊन साहित्यात देखील ठसा उमटवणारे प्रदीप कुलकर्णी

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदे 

दि.३० ऑगस्ट २०२४

प्रतिनिधी,

माजलगाव जिल्हा बीड येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक माजलगाव परिसर व साप्ताहिक बडबड या वृत्तपत्रांचे संस्थापक संपादक प्रदीप कुलकर्णी यांना एस फोर सोल्युशन या संस्थेचा साहित्यरत्न हा पुरस्कार जाहीर झाला असून आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी त्याचे वितरण पुणे येथील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी समारंभ पूर्वक होणार आहे. 

प्रदीप कुलकर्णी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन. 

त्यांच्याबद्दल सांगावयाचे झाल्यास ते हाडाचे पत्रकार असून वाचन , लेखन हा त्यांचा मुख्य छंद आहे.  त्यांनी अनेक कथा,  कादंबऱ्या वाचल्या आहेत आणि त्यांनी स्वतः भरपूर असे लिखाण केले आहे . त्यांची निवांत नावाची पहिली कादंबरी 1984 ला प्रकाशित झाली , ही कादंबरी जगदंबा प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केली.  या कादंबरीचा प्रकाशन समारंभ तत्कालीन शिक्षक आमदार डि के देशमुख यांच्या हस्ते सिरसाळा येथे संपन्न झाला होता. 

कथा९  कादंबरी,  कविता वाचनाच्या छंदातून प्रदीप कुलकर्णी यांनी शिरसाळा येथे 1981 ला विवेक वाचनालय स्थापन केले होते .  त्यांचे विविध वृत्तपत्रात कथा  व विविध विषयावरील लेख  प्रकाशित झाले आहेत.  अनेक दिवाळी अंकातून त्यांच्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत . निवांत या कादंबरी नंतर त्यांनी मीनाक्षी या नावाची कादंबरी लिहिली.  आणि ती पूर्ण केली . परंतु पुस्तक रूपाने पुढे ती प्रकाशित झाली नाही.  त्यानंतर मला घटस्फोट हवाय,  ओवाळणी या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि त्याचे प्रकाशन माजलगाव परिसर च्या अंकातून क्रमशः करण्यात आले त्याचप्रमाणे ओवाळणी ही कादंबरी चिकू या तत्कालीन साप्ताहिक आतून क्रमशः प्रकाशित करण्यात आली होती. 

प्रदीप कुलकर्णी यांच्या साहित्याचा वाचक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असून 2020 पासून त्यांनी प्रतिलिपीवर लिखाण करायला सुरुवात केली आहे.  त्यांच्या नऊ कादंबऱ्या प्रकाशित असून तीन कादंबऱ्यांचे प्रकाशन सुरू आहे.  एकूण बारा कादंबऱ्या प्रतिलिपीवर ऑनलाइन वाचकांना वाचायला उपलब्ध आहेत.  नुकतेच "प्रेमात पडायचे होते पण"  ही कादंबरी पुस्तक रूपाने प्रतिलिपी प्रकाशन ने प्रकाशित केली आहे.  या कादंबरीचे संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांनी स्वागत केले आहे.

प्रदीप कुलकर्णी यांनी आतापर्यंत 200 ते 300 लघुकथा लिहिल्या असून त्यापैकी 110 लघुकथा प्रति लिपीवर प्रकाशित झाल्या आहेत.  यात काही लेखांचा देखील समावेश आहे.  प्रतिलिपीच्या वतीने त्यांना तीन वेळा फेलोशिप प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे . प्रतिलिपीच्या स्पर्धा मधून ते सातत्याने सहभाग घेत असतात,  त्याबद्दल त्यांना सहभाग प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे . साहित्य क्षेत्रात त्यांची खूप मोठी सेवा असून वृत्तपत्र क्षेत्रात देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे . माजलगाव परिसर च्या जन्मा आधी त्यांनी दैनिक झुंजार नेता,  दैनिक चंपावती पत्र , दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे शिरसाळा येथे वार्ताहर म्हणून काम केले आहे. 

अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना आणि कोणताही राजकीय किंवा सामाजिक वारसा नसताना प्रदीप कुलकर्णी यांनी स्वतःला घडविण्यात स्वतःचेच खूप मोठे असे योगदान दिलेले आहे.  कोणाचे मार्गदर्शन नाही,  कोणाचे सहकार्य नाही आणि तरीही त्यांनी आपण आपल्याला घडविले पाहिजे असे ध्येय मनाशी बाळगून ते सातत्याने परिस्थितीशी झगडत स्वतःला सिद्ध करत राहिले आणि 1987 साली त्यांनी माजलगाव परिसर हे वृत्तपत्र माजलगाव येथे प्रकाशित करायला सुरुवात केली.  त्यापूर्वी ते माजलगाव पत्रिका या तत्कालीन साप्ताहिकांमध्ये कार्यकारी संपादक म्हणून माजलगाव येथे रुजू झाले होते . या ठिकाणी त्यांना वृत्तपत्र चालवण्याचा चांगला अनुभव आला . आणि या अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी माजलगाव परिसर ची स्थापना केली.  आणि आज या वृत्तपत्राचा वाचक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे.  माजलगाव परिसर चा दिवाळी अंक तर ते खूप असा आकर्षक प्रकाशित करत असतात.  पत्रकारितेत त्यांचे खूप मोठे योगदान असून संघटनात्मक कार्यात देखील ते आघाडीवर आहेत . असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे ते बीड जिल्हाध्यक्ष होते . तेव्हापासून ते या संघटनेत कार्यरत आहेत . आज ते या संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत . ते कोणतेही काम मनावर घेतले की पाठीमागे पाहायचे नाही पुढे चालायचे असा त्यांचा स्वभाव असल्याने संघटनेत देखील ते एक एक पाऊल पुढेच टाकत गेले.  आज त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये छोट्या वृत्तपत्रांची चांगली संघटना उभी राहिलेली दिसते.

पत्रकारितेत काम करताना त्यांनी साहित्याची खूप मोठी सेवा केली असून अनेक वाचक त्यांच्या साहित्याची नेहमी प्रतीक्षा करत असतात.  प्रतिलिपीवर सहा लाख संख्येपेक्षा जास्त वाचक त्यांचे आहेत.

या सर्व साहित्य सेवेचा आणि साहित्यातील योगदानाची दखल पुणे येथील एस फोर सोल्युशन या भारतामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या एका प्रकाशन संस्थेने घेतली.  आणि त्यांना 2024 चा साहित्यरत्न पुरस्कार जाहीर केला. त्याचे वितरण आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी एस एम जोशी सभागृह पत्रकार भावना जवळ पुणे येथे संपन्न होत आहे.

प्रदीप कुलकर्णी यांच्या पत्रकारितेतील आणि साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे . त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.

                    दिगंबर सोळंके

                        संपादक 

   साप्ताहिक लोक प्रचारक माजलगाव जिल्हा बीड

Related Post