योग्य वेळी खरीप हंगामातील पिकांसाठी पूर्व तयारी करणे गरजेचे -नारायण निबे

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२८मे २०२४

प्रतिनीधी,

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने व लोकनेते श्री. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का. लि., ज्ञानेश्वरनगर भेंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ मे २०२४ ते ८ जून २०२४ दरम्यान खरीप हंगामपुर्व शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्र चे आयोजन कृषि विज्ञान केंद्राच्या नेवासा व शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये  करण्यात आले आहे. या चर्चा सत्राच्या निमित्ताने आज दिनांक २८ मे २०२४ रोजी श्री. पांडुरंग मंदिर, रस्तापूर येथे ऊस पिकातील हुमणी व्यवस्थापन, खरीप हंगामाची पूर्व तयारी, माती परीक्षण आणि जैविक घटकांचा वापर तसेच जनावरांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या विषयावर शेतकरी शास्रज्ञ चर्चासत्र पार पडले.  

या चर्चा सत्रात गट ओव्हरसिअर श्री. संजय पाटील यांनी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का.लि., ज्ञानेश्वरनगर भेंडा यांनी कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेची तसेच कारखान्यामार्फत उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध कृषि निविष्ठा यांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

श्री. नारायण निबे , विषय विशेषज्ञ (कृषि विद्या), कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योग्य वेळी खरीप हंगामातील पिकांची पूर्व तयारी करणे गरजेचे आहे हे सुचविले. खरीप हंगामातील पिकांसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा, सेंद्रिय खते व रासायनिक खते, बी बियाणे, किटकनाशके यांची वेळीच उपलब्धता करून ठेवण्या संबंधी मार्गदर्शन केले. तसेच ऊस पिकातील हुमणी व्यवस्थापनासाठी हिच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. हुमणी नियंत्रणासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामातील पिक व्यवस्थापनासाठी माती परीक्षण आणि जैविक घटकांचा वापर तसेच जनावरांची पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या सुधारित वाणांची माहिती त्याचप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयी माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमास अरुण सावंत, बाळासाहेब हारकल, शंकर रिंधे, रामभाऊ आंबाडे, भास्करराव भाकड, तसेच मोठ्या प्रमाणावर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अरुण सावंत यांनी मानले.

Related Post