संघर्षनामा वृत्तसेवा। श्रीगोंदा
दि.28 जाने. 2025
प्रतिनिधी -
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण केले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा प्रमुख भाग असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असून त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे.
पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊन गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
याप्रसंगी मंत्री डॉ. पंकज भोयर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.