किल्ले संवर्धन एक गरज आणि जबाबदारी- प्रा. डॉ. राजू देविदास म्हेत्रे

संघर्षनामा वृत्तसेवा। जामखेड

दि.28 जाने. 2025 

प्रतिनिधी - उज्वला उल्हारे

 महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपल्यासाठी केवळ ऐतिहासिक स्मृतीच नव्हे तर, ते आपल्या संस्कृतीचा, त्यागाचा, शूरवीरांच्या बलिदानाचा, स्वाभिमानाचा आणि इतिहासाचा अभिमानास्पद ठेवा आहेत. आणि हा ठेवा जपून ठेवणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. याचे कारण म्हणजे या गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी आपले रक्त सांडले आहे. प्राणाची आहुती दिलेली आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. यासाठी आपणा सर्वांना किल्ल्याचे महत्व समजणे गरजेचे आहे. गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राची ओळख आणि स्वाभिमानाचा वारसा. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले आज केवळ ऐतिहासिक वास्तू नसून भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे स्मारक आहेत. यांचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

•  किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व-

गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा उपयोग स्वराज्य निर्मितीसाठी केला. त्याचप्रमाणे मराठ्यांच्या पराक्रमाच्या  अनेक गाथा या गडकिल्ल्यांनी पाहिल्या आहेत.

•  सांस्कृतिक महत्त्व-

किल्ल्यांवरून आपणास प्राचीन स्थापत्यकला, युद्धनीती, जलव्यवस्थापन आणि पर्यावरणसंवर्धन कसे केले जात होते, हे शिकण्यासारखे आहे. शिवकालीन गडकिल्ले ही प्रेरणादायी ठिकाणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला पराक्रम आणि त्याग आजच्या पिढीला देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी शिकवतो.

•  पर्यटनाचे महत्त्व-

आज गडकिल्ले हे पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी आकर्षण केंद्र बनले आहेत. राजस्थान मधील किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करून त्याचा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जसा उपयोग केला तसेच महाराष्ट्रात देखील करता येऊ शकतो. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. दुर्दैवाने, आज अनेक किल्ल्यांची सध्यस्थिती अत्यंत वाईट असताना दिसत आहे. त्याचे प्रमुख कारण आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील...

•  उपेक्षा आणि दुर्लक्ष - योग्य देखभाल आणि संवर्धनाचा अभाव.

•  अनधिकृत बांधकामे - किल्ल्यांवर अतिक्रमण आणि बांधकामे.

•  पर्यटकांचे गैरवर्तन - किल्ल्यांवर कचरा टाकणे, भिंतींवर नावे कोरणे.

  किल्ला संवर्धनाचे उपाय-

१) जागरूकता वाढवणे शाळा, महाविद्यालये आणि समाजात गडकिल्ल्यांचे महत्त्व पटवून देणे. 

२)  स्वच्छ गड-स्वच्छ भारत सारख्या मोहिमांमध्ये सहभाग घेण

३) स्थानिक प्रशासन आणि सरकारची भूमिका पुरातत्व विभागाने अधिक निधी उपलब्ध करून देणे. 

४) किल्ल्यांवर अनधिकृत प्रवेश आणि अतिक्रमण थांबविणे.

५)  जनतेचा सहभाग: गडसंवर्धन मोहिमांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक. 

६)  गड चढताना आणि फिरताना स्वच्छता राखण्याचे नियम पाळणे.

७)  योग्य सुविधा निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करणे.

८) पुरेशा प्रमाणात स्वच्छता गृहांची उभारणी असावी विशेषता महिला पर्यटकांची काळजी घेणे आवश्यक आहे.

गडकिल्ले हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. स्वच्छता, जागरूकता आणि जबाबदारीने वागल्यास गडकिल्ले पुन्हा एकदा आपली ओळख टिकवून ठेवतील. गडकिल्ल्यांचे संवर्धन म्हणजे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि संस्कृतीचा आदर. ही काळाची गरज आहे, कारण ते आपल्या इतिहासाचे मूर्त स्वरूप आहे. गडकिल्ले वाचवणे म्हणजे महाराष्ट्राचा गौरव जपणे होय.

आपले गडकिल्ले आपली ओळख, त्यांचे संरक्षण आपली जबाबदारी! आपले किल्ले हे आपले वैभव आहेत. आपण सर्वांनी मिळून हे किल्ले संवर्धित करणे हे आपले कर्तव्य आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले हे अभेद्य गड-किल्ले आपल्याला नुसते अभिमानास्पद वाटत नाहीत, तर ते आपल्याला एक नवा जोश देतात. त्यामुळे गड-किल्ले राखू, इतिहास जपू असा संकल्प करणे व ते आचरणात आणणे हे प्रत्येक नागरिकाचे अद्य कर्तव्य आहे.

Related Post