मांगवीर महामोर्चा भूमिका आणि आवाहन..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२३फेब्रुवारी २०२५

मित्रहो,

महाराष्ट्रातील आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई 90 च्या दशकापासून सुरू आहे. तसे पाहिले तर, ही लढाई सर्व दलितांची व्हायला पाहिजे होती, परंतु  ती मातंग समाजाने पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे. या लढाईचे महत्त्व अनुसूचित जाती मधील शिकलेल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळले पाहिजे आणि त्यांनी खरंतर  या चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले पाहिजे. 

 आपल्या समाजामध्ये शिकलेले काही लोक या चळवळीमध्ये सक्रिय आहेत, परंतु त्यातले काही जण केवळ नकारात्मक आणि फक्त नकारात्मक लिहीत आहेत, बोलत आहेत. त्यांच्यामधली ही नकारात्मकता व्यक्तिद्वेषातून आहे की काय समजायला मार्ग नाही...असे असले तरी, सकारात्मक भूमिका घेणाऱ्या चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण चळवळ आता आपल्या लढ्याचे टोक बनवली पाहिजे. 

मित्रहो,  इतिहासामध्ये फार मागे जाण्याचे कारण नाही. मात्र , 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने "प्रत्येक राज्यातील सरकारने आरक्षण उपवर्गीकरण आपापल्या राज्यामध्ये लागू करावे असा अत्यंत महत्त्वपूर्ण  निकाल दिला. त्यानंतर हरियाणा, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचे धोरण राबविण्याचा निर्णयही तेथील सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे सरकार आरक्षण उपवर्गीकरण धोरणाचे समर्थक आहे. पण त्यांच्याकडून अद्याप सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने काही ठोस कृती होताना दिसत नाही. निवडणुकीच्या अगोदर न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना करण्यात आली. पण त्या समितीला काम करण्याची  संधी व सुविधा मिळाली नाही. निवडणुकीच्या धामधुमीत ते शक्यही झाले नाही, परिणामी समितीला दिलेला तीन महिन्यांचा कालावधी संपून गेला. नुकतीच महाराष्ट्र सरकारने  न्यायमूर्ती बदर समितीला आठ महिन्यांची मुदत वाढ दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले आहे. ही आठ महिन्यांची मुदत वाढ निश्चितच समर्थनीय नाही. खरे तर, या समितीने दोन ते तीन महिन्यांमध्ये आपला अहवाल द्यायला काही हरकत नाही. त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारवर आपण दबाव टाकायला हवा. त्यासाठी विधानभवनावर धडक मारायलाच हवी. 

दुसरा महत्त्वाचा भाग, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिले आहे की, अनुसूचित जातीच्या राखीव असलेल्या जागा काही बिगर अनुसूचित जातीच्या लोकांनी बनावट जात प्रमाणपत्र घेऊन हडप केल्या आहेत. आरक्षणातील ही जात चोरी या विरुद्धही आपण आवाज उठवला पाहिजे आणि असे बनावट जात प्रमाणपत्र मिळवून दलितांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या बिगर अनुसूचित जातीच्या लोकांना जन्मठेपेची शिक्षेची तरतूद केली पाहिजे, अशा काही मागण्या घेऊन आम्ही बुधवार, दिनांक 5 मार्च 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चा घेऊन येत आहोत.

          5 मार्च ही तारीख घेण्यामागे देखील एक निश्चित अशी भूमिका आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरण चळवळीमध्ये शहीद संजय ताकतोडे यांनी 5 मार्च रोजी बीड जिल्ह्यातील बिंदुसरा धरणामध्ये आपले बलिदान दिले. संजय ताकतोडे यांच्या स्मरणार्थ मंगवीर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

        मांगवीर असे नाव देताना  असा विचार होता की, मांग ही आपली ओळख असली तरी आपण वीर आहोत ही आपली ओळख आपल्याला पुन्हा प्रस्थापित करावयाची आहे. इतिहासामध्ये आपल्या समाजातील अनेक शूर वीर योद्धे  होऊन गेले आहेत. परंतु काळाच्या ओघात आपल्यातले विरत्व जणू संपुष्टात आले आणि आपण फक्त मांग राहिलो आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपल्यामध्ये विरत्व यावे, शूरत्व यावे या भावनेतूनही  मांगवीर महामोर्चा.. असे नाव दिले आहे. मनोज जरांगे  आपल्या मराठा बांधवांना आवाहन करतात की, मराठ्यांनो  योद्धा सारखे मोर्चाला या तोच धागा पकडून आम्ही आमच्या समाजातील बांधवांना म्हणत आहोत की, मांगांनो, वीरा सारखे महामोर्चा मध्ये सहभागी व्हा म्हणजेच मांगवीर महामोर्चा मध्ये वीरा सारखे सहभागी व्हावा. आमचे बौद्ध बांधव स्वतःला भीमसैनिक म्हणतात. सैनिक म्हणजे वीर असाच अर्थ आहे.  1956 ला धर्मांतर करून बौद्ध झालेले हे भीमसैनिक 1  जानेवारीला भीमा कोरेगाव येथे एकत्र येतात आणि आपल्या महार पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचे अभिमानाने कौतुक करतात. आपण महार वीर असल्याचे गौरवाने सांगतात. महारवीर असल्याचे गाणे गातात. मग आपण मांगवीर म्हणून आझाद मैदानावर येण्यात अडचण काय आहे ?

 उलट आपण वीरा सारखे, योद्धा सारखे, सैनिका सारखे आझाद मैदानावर आले पाहिजे. आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे आणि आपल्या भावी पिढ्यांच्या साठी आवश्यक असणारे आरक्षण उपवर्गीकरण आपण मिळवले पाहिजे. ही लढाई आपण जिंकली पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या या लढाईमध्ये चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी एकत्र येऊन मांगवीर महामोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे  गाव - तालुका - जिल्हास्तरावर रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या मातंग समाजातील तमाम बांधवांना आम्ही आवाहन करीत आहोत की,  5 मार्च रोजी होणाऱ्या मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या मांगवीर महामोर्चा मध्ये सहभागी होऊ या.  शहीद संजय ताकतोडे यांना अभिवादन करूया.  सरकारला सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडूया.

प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे

संस्थापक अध्यक्ष,

 दलित महासंघ, महाराष्ट्र

Related Post