दि . ७डिसेंबर २०२५
प्रतिनिधी ,
तांदळी दुमाला ता.श्रीगोंदा येथे सिद्धार्थ नगर परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जगप्रसिद्ध विचारवंत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. आधुनिक लहुजी सेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमाला समाज बांधव व बौद्ध अनुयायांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना संतोष शिंदे म्हणाले की,
महामानवांची विचारधारा अंगिकारणे ही काळाची गरज आहे. भारतीय समाजाला जागृत करण्याचे आणि समतेचा मार्ग दाखवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यांनी दिलेल्या विचारांनी आजही प्रत्येक पिढीला मार्गदर्शन मिळते.
यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या प्रभावी विचारांचा उल्लेख करताना सांगितले की,
माझा देश हा बिना डोक्याचा बाजार आहे; इथे चटणी कोरडी खातील अन तेल दगडावर ओततील… लोकांच्या अंगात देवी-भूत येतात, पण शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले यांसारखे विचारवंत का येत नाहीत? जेव्हा विचारवंत अंगात येतात, तेव्हा भारत जगावर राज्य करेल,असे बाबासाहेब सांगत .
चौकट
संतोष शिंदे यांनी परिवर्तनाची गरज अधोरेखित करत, सामाजिक ऐक्य, बंधुता व प्रगल्भ विचारांची आजच्या काळाला आवश्यकता असल्याचे सांगितले.
चळवळीत काम करायला भिणारे माणसं जिवंतपणी मेलेली असतात. पण चळवळीने पेटलेले लोक मेल्यानंतरही जिवंत राहतात,या बाबासाहेबांच्या वचनांचा उल्लेख करून त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा करून त्यांचे योगदान स्मरण करण्यात आले. उपक्रमासाठी सिद्धार्थ नगर परिसरातील बौद्ध, भीम अनुयायी तसेच समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.