संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२०ऑगस्ट २०२४
शिरूर कासार (वार्ताहर) : अत्यंत कमी कालावधीत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आपल्या कार्याने राज्यभर नावलौकिक मिळवणारे एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था कौतुकास पात्र असून फाउंडेशन मधील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या चतुरस्र कामगिरीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत एकता फाउंडेशन च्या शाखा स्थापन झाल्या आहेत असे प्रतिपादन उदगीर जि.लातूर येथील एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे विभागीय सचिव प्रा.आंबादास केदार यांनी केले. रक्षाबंधन निमित्त आयोजित 24 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
काव्य संमेलनाच्या उद्घाटक पदी शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक तथा अभिनेते राजकुमार तांगडे यांची एकता कोअर कमिटीने निवड केली होती. यावेळी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, मार्गदर्शक प्रा.डाॅ.भास्कर बडे, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयकुमार कस्तुरे (चिखली-बुलढाणा), रश्मी धर्माधिकारी (यवतमाळ), अर्चना डावखर-शिंदे (बोधेगाव-आहिल्यानगर), सुवर्णा पवार (इचलकरंजी-कोल्हापूर), सरला कापसे (वर्धा) या निमंत्रित मान्यवर कवी कवयित्रींनी यावेळेस एक से बढकर एक रचना पेश करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
एकता फाउंडेशन पाटोदा तालुका संघटक, युवाकवी ॲड.विशाल म्हस्के यांनी या काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले. एकता फाउंडेशन केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातील निवडक मान्यवर कवी कवयित्रींनी या संमेलनात सहभाग नोंदवला.