संघर्षनामा नामा l श्रीगोंदा
दि.१५ऑगस्ट २०२४
प्रतिनिधि,
चला, आज एका नवीन विषयावर बोलूयात. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम असे सांगतात की युवक हीच देशाची खरी संपत्ती आहे. हे वाक्य वाचत असताना आपल्या मनात मी खरोखर एक सक्षम युवक असल्याची जाणीव झाली असेल. भारत देश स्वतंत्र होऊन तब्बल 77 वर्ष झाली आहेत. या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये युवकांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, शिरिषकुमार असतील यांचा विचाराने प्रेरित होत आपल्या प्राणाची कसलीही पर्वा न करता स्वतःचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं. भलेही आता बलिदान देण्याची वेळ नसेल पण युवकांनी पुढे येऊन आपला गाव, तालुका, जिल्हा यांच्या भवितव्यासाठी काही नवीन सुधारणा करता येईल का याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे आजच्या युवकाच्या समोर सर्वात मोठा प्रश्न आहे माझ्या गावात कशी सुधारणा घडवून आणावी मी यांचा विचार केला पाहिजे. युवकच देशाचे भवितव्य बदलू शकतो. मात्र आजचा युवक तसं करताना दिसत नाही. तो कुठेतरी पार्टी करताना, मौज-मस्ती करताना दिसत आहे. पण आता ती वेळ नाही. या जगासमोर मी एक कर्तृत्ववान युवक आहे याची जाणीव करण्याची वेळ आली आहे. मी काहीतरी करू शकतो, मग ते शिक्षण असेल, कृषी असेल की राजकीय असेल या प्रत्येक क्षेत्रात युवक म्हणून माझी कशी ओळख निर्माण करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. माझे वडील ऊस तोडतात म्हणून मी तो तोडणार नाही तर मी कारखान्याचा मालक कसा होईल यांचा युवकांनी विचार केला पाहिजे. कारण आपले आई वडील जे करतात त्या पेक्षा आपण वरचढ केलं पाहिजे. भलेही मग ते कोणतेही क्षेत्र का ना असेना. कारण आपण नाही बदलणार तर मग कोण बदलणार. जेवढ मोठं स्वप्न बघता येईल तेवढं बघितलं पाहिजे. मला काही युवकांचा खुप हेवा वाटतो की ते युवक ऑलिंपिकमध्ये आपलं कर्तृत्व गाजवतात, काही क्रिकेट, काही अधिकारी, काही युवा शेतकरी खुप छान कार्य करत आहेत. पण आजकाल असेही होत आहे की बारावीला मार्क कमी पडले की आत्महत्या करणे, नोकरी नाही लागली तर नैराश्यातून काहीतरी करणे, मुलीने धोका दिला म्हणून व्यसन करणे हे प्रमाण आता जास्त होत आहे. याचा युवकांनी विचार करून आपण काय करतोय यांची जाणीव झाली पाहिजे.