नागवडे इंग्लिश मीडियम ची बालदिंडी उत्साहात संपन्न.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.१८जुलै २०२४

लिंपणगाव प्रतिनिधी,

पाऊले चालती पंढरीची वाट...श्रीगोंदा ही संतांची भूमी समजली जाते. या भूमीतील श्री संत शेख महंमद महाराज यांना देशातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जाते. आषाढी एकादशीचे औचित्य साधत नागवडे इंग्लिश मीडियम च्या बाल वारकऱ्यांनी माऊली माऊली माऊली च्या नाम घोषात शेख महंमद महाराजांच्या प्रांगणामध्ये दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा केला.


प्रसंगी बाल वारकऱ्यांनी भारुड सादर करून भारतीय रुढी आणि परंपरा यांचे महत्त्व तसेच त्यांचे वैज्ञानिक दृष्ट्या कारण उपस्थितांच्या लक्षात आणून देत नैतिकतेचा संदेश या निमित्ताने दिला.तसेच खास महाराष्ट्रीयन कला अशी ओळख असलेल्या पावली, झांज आणि लेझीम पथकांनी कार्यक्रमात रंग भरला. तर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम होते. यावेळी श्री निकम यांच्यासह ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी. के. लगड, डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे यांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.नगरसेविका गयाताई सुपेकर, कुंदन धालवडे, पाथरे साहेब, सुरेखा ताई लकडे, पूनम ताई फिरोदिया यांच्यासह महिला पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय प्रशासन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते. आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक ओळख, परंपरा आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचे असणारे महत्त्व, त्यांनी केलेला त्याग विद्यार्थ्यांचा बालमनांवर बिंबवावा यासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर वारी, दिंडी साजरी करत असल्याचे निरीक्षक एस.पी. गोलांडे यांनी सांगितले.


विद्यालयाची बाल दिंडी शेख महंमद महाराज मंदिराकडे मार्गस्थ होत असताना श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रशांत उबाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.


दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस.पी.गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका नागवडे यांनी केले.तर प्रमुख पाहुणे व मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला पालकांचे निरीक्षक श्री.गोलांडे यांनी आभार मानले.

Related Post